यशोदा नदीच्या पुनरुज्जीवनाने १४३ गावांत होणार जलसमृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:57 PM2019-02-27T12:57:11+5:302019-02-27T12:59:50+5:30
वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीचे पुनर्जीवन होऊन चार तालुक्यातील १४३ गावे आता जलसमृद्ध होेण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी चार तालुक्यात विस्तारलेली यशोदा नदी वरदायिनी ठरली होती. परंतु, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाच्या ºहासासोबतच नदीपात्रही दूषित होत गेले. तिला पाणी पुरविणारे ओहोळ व नाले गाळाने काठोकाठ भरल्यामुळे पाणीवहन क्षमता कमी होऊन खळखळ वाहणारी नदी कोरडीठाक झाली. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यानंतर २०१६ मध्ये यशोदा नदी पुनर्जीवनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. यामुळे आता पुन्हा यशोदा नदीचे पुनर्जीवन होऊन चार तालुक्यातील १४३ गावे आता जलसमृद्ध होेण्याची शक्यता आहे.
यशोदा नदीचे खोरे आर्वी तालुक्याच्या बोरी या गावापासून उगम होऊन पुढे हिंगणघाट तालुक्यातील कान्होली या गावी वर्धा नदीला मिळते. त्यामुळे ही नदी आर्वी, वर्धा, देवळी आणि हिंगणघाट या ४ तालुक्यात विस्तारली आहे. जिल्ह्यातील तब्बल १४३ गावांचा समावेश या नदीच्या खोऱ्यात होतो. कालांतराने नदीचा प्रवाह थांबल्याने या सर्व गावात जलसंकट निर्माण झाले होते. त्यामुळे २०१५ मध्ये शासनाचे जलयुक्त शिवार अभियान सुरू झाल्याने नदीचेही दिवस पालटायला लागले. टाटा ट्रस्ट आणि कमलनयन बजाज फाऊंडेशनने यशोदा नदी पुनर्जीवन प्रस्ताव तयार केला. केवळ खोलीकरणच नाही, तर यशोदा नदीच्या उपनद्या, ६ पाणलोट क्षेत्र आणि १९ लघु पाणलोट क्षेत्राचा विकास आणि खोऱ्यातील सर्व गावांसह सर्वसमावेशक असा हा आराखडा होता. १४३ गावांत माथा ते पायथा काम करण्यावर भर देण्यात आला. शासनाने टाटा ट्रस्ट, कमलनयन बजाज फाऊंडेशन यासारख्या संस्थांसोबतच लोकसहभागाचा आधार घेत प्रकल्पाचे काम सुरू केले. या प्रकल्पाची सुरुवात २०१६ मध्ये वायफड या गावांपासून करण्यात आली. या एकाच गावात १९ किलोमीटरचे नाला खोलीकरणाचे काम केले असून त्यात ७५ ते ८० टक्के शिवार अंतर्भूत झाले आहे. आता या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील २ लाख ४ हजार ५३० एकर जमिनीला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होणार असल्याने त्याचा २० हजार शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, गावांतील पारधी समाजातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळत आहे.
अदृश्य नदी झाली दृश्य
या प्रकल्पामुळे चारही तालुक्यातील यशोदानदीचे अदृश्य झालेले नदीचे पात्र पुन्हा दृश्य झाले.गाव जलमय होण्यासोबतच पीक पद्धतीही बदलली. यशोदा नदी खोºयातील एकूण ६३० किलोमीटर लांबीपैकी सद्यस्थितीत ३५० किलोमीटरचे नदी आणि नाल्याचे खोलीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये ११९ गावांचा समावेश आहे. त्यासाठी २७ कोटी रुपये खर्च झाला असून ६० लाख ६७ हजार २३ घन मीटर गाळाचा उपसा करण्यात आला. यामुळे ६ हजार ६७ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाल्याने २० हजार ७२१ शेतकऱ्यां लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. नाल्याचे पाणी शेतात शिरत असल्याने १ लाख ५ हजार ५३० एकर शेती पडीक राहत होती. ती आता पहिल्यांदाच वाहितीखाली आली आहे. गावातील भूजल पातळीत वाढ झाली असून गावातील विहिरी, विंधण विहिरींना भरपूर पाणी आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला आता १२ महिने पाणी असते. परिणामी, शेतकऱ्यांना बारमाही पिकांसोबत आंतरपिके घेण्याची सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
प्रकल्पाची दखल; राष्ट्रीय जलपुरस्काराने सन्मान
भारत सरकारच्या जलसंधारण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर जलसंधारण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्राला १० पुरस्कार मिळाले आहे. यात वर्धा जिल्ह्याला नदी पुनर्जीवन या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, कल्पना व नवतंत्रज्ञानाचा वापर यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सद्भावना ग्रामीण विकास संस्थेला मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वीकारला.