'इव्हिएम मशीनमध्ये १५ लाखात फेरफार करून देतो' ; आमदारांना एसएमस करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:18 PM2017-11-14T13:18:41+5:302017-11-14T13:22:52+5:30
पंधरा लाखात निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे मेसेज निवडणूक आयोगाच्या नावाने टाकणाऱ्या नांदेड येथील २१ वर्षीय तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
नांदेड - पंधरा लाखात निवडणूक मतदान यंत्रात फेरफार करून देतो. अशा आशयाचे मेसेज निवडणूक आयोगाच्या नावाने टाकणाऱ्या नांदेड येथील २१ वर्षीय तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे. या तरुणाने हिमाचल प्रदेशामधील ४३ आमदारांना असे मेसेज पाठविले असून, नुकत्याच पार पडलेल्या नांदेड मनपा निवडणूकीवेळीही त्याने काही उमेदवारांना असेच मेसेज पाठविल्याचे पुढे आले आहे. सचिन दत्ता राठोड ( रा. दयाळ धानोरा ता. किनवट ) असे या तरुणाचे नाव असून, तो पुण्यातील फर्ग्युसन महाविदयालयाचा पदविधर आहे. सध्या नांदेड शहरातील सुंदर नगर येथे रहात असून, स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.
चोरीच्या सिमकार्डचा वापर करून हिमाचल प्रदेश निवडणूक आयोगाच्या नावे त्याने त्या राज्यातील ४३ जणांना एसएमएस पाठविले. दहा लाख मतदानापूर्वी आणि पाच लाख निवडणूक निकालानंतर दिल्यास १५ लाखात मतदान यंत्रात फेरफार करून तुमचा विजय निश्चित करून देतो. असा मजकूर त्याने पाठविले. निवडणूक आयोगाच्या नावाने आलेल्या मेसेजमुळे उमेदवारही चक्रावले. दरम्यान या प्रकरणी हिमाचल प्रदेशातील सिमला येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना सदर मेसेज पाठविणाऱ्या तरुणाचे मोबाइल लोकेशन तेलंगणा, हैद्राबाद असे दिसून आले. अधिक तपासाअंती हा तरूण नांदेडचा असल्याचे उघड झाले.
पैशाच्या आमिषामुळे असे एसएमएस पाठविल्याचे या तरूणाने कबूल केले असून. या तरुणाने असे आमिष दाखवून कोणाकडून पैसे उकळले का? याचा तपास पोलिसांनी सुरू केल्याचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी सांगितले