नांदेड येथील उर्दू घराला उद्घाटनापूर्वीच आग; एसी चोरून नेताना शॉर्टसर्किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:06 PM2018-01-24T18:06:46+5:302018-01-24T18:07:18+5:30
उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ठिकाणी असलेल्या एका खोलीतील एसी चोरुन नेण्याचा प्रयत्न चोरट्याने केला असता, शॉर्टसर्कीटमुळे आग लागून खोलीतील साहित्य जळून खाक झाले.
नांदेड : उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ठिकाणी असलेल्या एका खोलीतील एसी चोरुन नेण्याचा प्रयत्न चोरट्याने केला असता, शॉर्टसर्कीटमुळे आग लागून खोलीतील साहित्य जळून खाक झाले.
नांदेड शहरात मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे़ त्यात देगलूर नाका भाग हा मुस्लिमबहुल म्हणून ओळखला जातो़ या भागात उर्दू घर उभारावे, अशी या भागातील नगरसेवकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती़ त्यानंतर उर्दू घरसाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला़ त्यातून तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले उर्दू घर उभारण्यात आले़ यातील प्रत्येक खोलीमध्ये सोफा, फर्निचर, वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली होती़ याच दरम्यान, या ठिकाणच्या अनेक साहित्याची चोरीही करण्यात आली होती़ याबाबत मनपाचे सभापती अब्दुल शमीम हे काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना भेटले होते़ त्यात मंगळवारी दुपारी उर्दू घरमधील एका खोलीत असलेली एसी चोरुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ यावेळी एसीचे वायर ओढल्याने शॉर्टसर्कीट झाला़ त्यामुळे खोलीला आग लागली़ आग लागताच चोरटा मात्र पसार झाला़ धुराचे लोळ पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले़ अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग विझविण्यात आली़, परंतु तोपर्यंत खोलीतील हजारो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले होते़ खोली आतून पूर्णपणे काळीकुट्ट पडली होती़
सुरक्षेचा प्रश्न कायम
मनपा निवडणुकीपूर्वी उर्दू घरचे उद्घाटन करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली होती़ परंतु दोन विभागातील वादामुळे उद्घाटन रखडले होते़ त्यात सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या़ त्यामुळे दिवसा अन् रात्रीच्या वेळी या सुसज्ज वास्तुत पत्त्यांचे डाव रंगत होते़ वातानुकूलित खोल्यांमध्ये मद्यपींच्या पार्ट्याही रंगत होत्या़ उद्घाटनापूर्वीच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या उर्दू घरची वाईट अवस्था झाली आहे.