पोलिसाची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 04:09 PM2018-02-04T16:09:45+5:302018-02-04T16:10:45+5:30

घरासमोरच राहणा-या एका सराईत गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी शिवाजी पुंडलिक शिंदे या कर्मचा-याची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना...

Policeman killed by crushed stone, pre-emptive criminals attacked the criminals | पोलिसाची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने केला हल्ला

पोलिसाची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने केला हल्ला

Next

नांदेड : घरासमोरच राहणा-या एका सराईत गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी शिवाजी पुंडलिक शिंदे या कर्मचा-याची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शहरातील दत्तनगर भागात घडली़ लॉन्ड्रीवर कपडे टाकण्यासाठी जात असताना बेसावध असलेल्या शिंदेचा हल्ल्यानंतर काही क्षणातच मृत्यू झाला़

आरोपी तुळजासिंह कन्हैय्यासिंह ठाकूर (४७) हा दत्तनगर परिसरात राहतो़ तुळजासिंह याच्यावर चोरी, दादागिरी, प्राणघातक हल्ला, हुंडाबळी यासारखे अनेक गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत़ तुळजासिंह याच्या घरासमोरच पोलिस कर्मचारी शिवाजी शिंदे यांचेही घर आहे़ प्रत्येक प्रकरणात तुळजासिंह याच्यावर कारवाई झाल्यानंतर तो शिंदे यांच्या सांगण्यावरुनच कारवाई झाल्याचा संशय घेत होता़ या विषयावरुन तुळजासिंह याने शिंदे यांच्याशी काही वेळा वादही घातला होता़ परंतु शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते़ मागील वर्षी शिंदे हे अर्धापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्या ठिकाणी तुळजासिंह याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता़ त्याही वेळी तुळजासिंह याने शिंदे यांच्यासोबत वाद घातला होता़.

दोघांचीही घरे एकमेकांसमोरच असल्यामुळे दररोज त्यांची नजरा नजर होत होती़ परंतु प्रत्येक वेळी शिंदे त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते़ त्यात काही महिन्यापूर्वीच शिंदे हे स्थानिक गुन्हे शाखेत रुजू झाले होते़ त्यामुळे तुळजासिंहच्या संशयात आणखी भरच पडली़ शनिवारी रात्री परभणी येथील ऊर्सानिमित्त बंदोबस्तानंतर रविवारी पहाटे शिंदे हे घरी आले होते़ त्यानंतर महापालिकेच्या जलतरणिकेत स्विमींग करण्यासाठी गेले़ स्विमींग करुन सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास परत घरी आले़ त्यानंतर एका पाहुण्याच्या मुलासाठी मुलगी पाहायला जायचे असल्यामुळे घरातील ड्रेस घेवून तो ईस्त्री करण्यासाठी घरासमोरच असलेल्या लॉन्ड्रीवर गेले़ यावेळी लॉन्ड्री चालकाशी बोलत असताना, दबा धरुन बसलेल्या आरोपी तुळजासिंह याने शिंदे यांच्यावर डोक्यात दगड घातला़ काही कळायच्या आत शिंदे खाली कोसळले़ त्यानंतर तुळजासिंह दोन-तीन वेळा दगडाने शिंदे यांचा चेहरा ठेचला़ जवळील खंजरनेही वार केले़ त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे यांचा काही मिनिटातच मृत्यू झाला़ अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली़ तुळजासिंह याने घटनास्थळावरुन पलायन केले़ पळून जाताना तुळजासिंह याने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली होती़ त्या दुचाकीस्वाराचे सीसी टिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत़ रहिवाशांनी घटनेची शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती दिली़ पोलिस घटनास्थळी पोहचले़ परंतु आरोपीच्या दहशतीमुळे पोलिसांना माहिती देण्यास कुणीही पुढे येत नव्हते़ आरोपी तुळजासिंहच्या शोधासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत़ या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

आरोपी तुळजासिंह सराईत गुन्हेगार
आरोपी तुळजासिंह याच्या नावाची दत्तनगर परिसरात दहशत आहे़ त्याच्यावर चोरी, हुंडाबळी, प्राणघातक हल्ला, दादागिरी करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत़ या भागातील अवैध धंदेवाल्यांचा तो म्होरक्या आहे़ त्याचबरोबर व्याजबट्टयाचा व्यवसायही तो करतो़ १९९७ मध्ये एका विधवा महिलेचे सात हजार रुपये चोरी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यावेळी त्याला सोडविण्यासाठी या भागातील अनेकांनी ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला होता़ पोलिसांनी त्याची घरझडती घेतली असता, तुळशी वृंदावनाच्या खाली त्याने चोरीतील रक्कम लपवून ठेवल्याचे उघडकीस आले होते़ त्यानंतर या परिसरात त्याची दादागिरी वाढली होती़ त्यात पोलिस कर्मचारी शिवाजी शिंदे यांनी दत्तनगर भागात त्याच्या घरासमोरच घर बांधले होते़ त्यानंतर तुळजासिंहच्या विरोधात अनेक ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते़ शिंदे यांच्या सांगण्यावरुनच आपल्यावर गुन्हे दाखल होत असल्याचा तुळजासिंह याला संशय होता़ या संशयातूनच त्याने शिंदे यांची हत्या केली़

शिंदे यांची मुले शिक्षणासाठी पुण्यात
शिंदे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे़ मुलगा पंडीत आणि ऊषा हे दोघे जण शिक्षणासाठी पुण्यात आहेत़ पंडीत हा अभियांत्रिकीला आहे तर ऊषा ही राज्य सेवेची तयारी करीत आहे़ तर लहान मुलगी आश्विनी ही नवव्या वर्गात आहे़ शिंदे हे पत्नी आणि आईसोबत दत्तनगर येथील घरी राहत होते़ अतिशय मनमिळावू असलेले शिंदे यांनी काही दिवस शहर वाहतुक शाखेतही काम केले़ कुणालाही शब्दाने ते कधी दुखवत नव्हते असे त्यांचे सहकारी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होते़

सहका-यांनी दिला होता घर विकण्याचा सल्ला
शिंदे यांनी दत्तनगर परिसरात घर बांधल्यानंतर वास्तुशांतीला आलेल्या त्यांच्या सहका-यांनी त्यांना हे घर विकण्याचा सल्ला दिला होता़ दत्तनगर परिसरात गुन्हेगारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून शिंदे यांनी तेथील घर विक्री करुन इतर ठिकाणी घ्यावा असे त्यांच्या सहका-यांनी सांगितले होते़ परंतु शिंदे यांनी परिसर चांगला असून सध्याच घर विकणार नसल्याचे सांगत मित्रांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते़

Web Title: Policeman killed by crushed stone, pre-emptive criminals attacked the criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.