बेरोजगारीवर मात करी, सहकारी भाजीपाला लॉरी ! 14 युवकांनी शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:31 AM2018-02-16T10:31:34+5:302018-02-16T10:31:40+5:30
सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे.
भूषण रामराजे/ नंदुरबार : 'सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे. व्यापारी मालाकडे दुर्लक्ष करायचे, आर्थिक नुकसान व्हायचं, शेवटी मग आम्हीच ठरविले आणि रस्त्यावर भाजीपाला विकला, पहिला प्रयत्न फसला, परंतु आता सहकारी भाजीपाल्याची लॉरी दौडू लागली आहे'. हे मनोगत आहे, चंदू गावीत ( रा बोकळझर, ता नवापूर, जि़ नंदुरबार) याचं नवापूर तालुक्यात फुललेल्या गटशेती चळवळीचा चंदू हा एक शिलेदार. ११५ एकरावर होणारी भेंडी शेती, काकडी, नर्सरीची गटशेती, औजार बँक यासह विविध उपक्रम तो राबवित आहे. आदिवासी युवकांमध्ये स्वाभिमान जगविण्याचं काम चंदू करत आहे़ त्यांच्या ‘सहकारी लॉरी’ची जन्मकथा ही एका नव्याच संकल्पनेची ओळख म्हणावी.
नवापूर तालुका हा तूर आणि भाताच्या विविध वाणांसाठी ओळखला जातो़ याच तालुक्यात गत १० वर्षात गटशेतीतून भाजीपाला उत्पादनाचे प्रयत्न सुरू झाले़ सुरुवातीला राज्याच्या विविध भागातील कृषी संस्थांच्या आधाराने फुललेला भाजीपाला गुजरात राज्यातील सुरत, बारडोली आणि वापी इथे जात होता. गेल्या दोन वर्षात पाऊस आणि इतर समस्यांनी गटशेतीला घेरले, गट विखुरले़ यातच चंदू गावीत हे सुरत येथे भाजीपाला विक्रीसाठी गेले असता, भाव पडल्याने भाजीपाला सोडावा लागला. या संकटातून मार्ग निघाला. सुरत येथेच भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावला. पहिल्या प्रयत्नात भेंंडी विक्री झाली़, आणि येथूनच सहकारी लॉरी सुरू करण्याची कल्पना उदयास आली.
नवापूर तालुक्यात २५ एकरात चंदू गावीत ही गटशेती करतात़ यात प्रमुख उत्पादन म्हणजे भेंडी, मेथी आणि कोथिंबीर. हा भाजीपाला घेत, सर्व १४ जणांनी बारडोली आणि परिसरात लॉरी भाड्याने घेत भाजीपाला विकला आणि उत्पादनाच्या ३० टक्के नफा मिळाला़ किरकोळ यश असले तरी त्यातून नवा मार्ग सापडला़ यातून ग्रामीण भागात १० आणि नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा येथे चार मोठ्या लॉरी आणि त्याला दिवसभर भाजीपाला आणून देणारे वाहन याची जोड दिली. आजघडीस नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या १५ लॉरींवर दर दिवशी एक क्विंटल भाजीपाला विक्री केला जातो़ केवळ स्वत: पिकवलेला भाजीपाला विक्री करून यश मिळणार नाही, हे जाणून गावीत व त्यांचे सहकारी इतर शेतक-यांसोबत संपर्क साधून त्यांचा भाजीपाला खरेदी करतात.
शेतक-यांना कोणत्याही प्रकारे वाहतूक खर्च, मार्केट फी, आडत कमिशन द्यावे लागत नाही. दर दिवशी १५ लॉरींवर किमान १० प्रकारच्या भाज्यांची विक्री झाली पाहिजे असे टार्गेट ठेवून काम केले जात आहे़ आलेला पैैसा एकत्र करून तो बँकेत भरला जातो. महिन्याच्या १ तारखेला उत्पादन खर्च वजा जाता मिळालेला नफा सर्वांमध्ये वाटला जातो, अगदी साध्यासोप्या आणि सरळ अशा व्यवहारामुळे महिन्याकाठी प्रत्येकाच्या गाठीला २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम हाती पडत असते.
भेंडी आणि काकडीतून आर्थिक स्थैैर्याकडे
- चंदू गावीत याच्यासोबतच हिरामण वळवी, वीरसिंग कोकणी, होबील गावीत, शंकर गावीत, जालमसिंग गावीत, वीरसिंग गावीत, वेच्या गावीत, नीलेश गावीत, दिनकर गावीत, बाबू गावीत, जिवल्या गावीत, आरसीगावीत हे १४ सहकारी लॉरीच्या प्रयोगात सातत्याने राबत आहेत.
- २५ एकर क्षेत्रात सध्या उत्पादन येत असलेल्या भेंडीला ७० हजारांपर्यंत एकरी खर्च येतो़ गेल्या दोन महिन्यात १०० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी विकून एकरी १ लाखाचा खर्च त्यांनी वसूल केला आहे़ अद्यापही भेंडी विक्री सुरू आहे़ दारोदार फिरून का होईना उत्पादन येणार, असा ठाम विश्वास असल्याने प्रत्येक जण नेमून दिलेल्या गावातील लॉरीवर सकाळी आठ वाजता पोहोचत आहे.
- गेल्या वर्षी सहकारी लॉरीतून युवकांनी १५ गुंठ्यात लागवड केलेली काकडी विकली होती़ ५५ हजार रुपये एकरी खर्च असलेल्या काकडीचे १८ टन उत्पादन आले. यातून एक लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत मिळत होते.
- शेतक-यांचा भाजीपाला थेट ग्राहकाच्या घरात ही संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न करणा-या या युवकांनी भाजीपाला पेरणीसाठीचा खर्चही स्वत:च घरातून उभा केला आहे.