नंदुरबारात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 27 रोजी विकास कामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:15 PM2018-01-24T18:15:35+5:302018-01-24T18:15:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकनेते बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व जल मल निस:रण प्रकल्पाचे लोकार्पण 27 रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी माँ-बेटी गार्डने भुमिपूजन देखील होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्व.बटेसिंह रघुवंशी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण 27 रोजी सकाळी 11 वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, खासदार राजीव सातव, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार रोहिदास पाटील, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार रजनी पाटील, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजीराव दहिते, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार उदेसिंह पाडवी, आमदार आसिफ शेख, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आमदार सुनील गामित आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यापूर्वी सकाळी दहा वाजता पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नळवा शिवारातील जल मल निस:रण प्रकल्पाचा शुभारंभ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
24 तास पाण्यासाठी नियोजन
शहराला 24 बाय सात योजनेअंतर्गत 24 तास पाणी पुरवठय़ासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासाठी कन्स्लटंट कंपनीला नेमण्यात आले असून सहा महिन्यात ते प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करतील अशी माहितीही आमदार रघुवंशी यांनी दिली. योजनेअंतर्गत बहुतेक आराखडा आधीच तयार आहे. त्यामुळे फारसे काम करण्याची गरज राहणार नाही. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला केवळ दोन प्रभागात ही योजना सुरू केली जाईल. वर्षभर तेथे देखरेख करून योजना यशस्वी झाल्यास संपुर्ण शहरात ती राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मात्र मिटर बसविण्यात येणार आहे.
शहरात शहरी ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत दोन दवाखाने बांधून तयार आहेत. पदांची भरती झाल्यास 1 फेब्रुवारीपासून ते देखील सुरू होतील. या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदभरतीचा अधिकार आता देण्यात आला आहे.
ट्रक टर्मिनस देखील 26 जानेवारीपासून कार्यान्वीत केले जाणार आहे. जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेर्पयत शहरात प्रवेश बंदीची मागणी प्रशासनाकडे पालिकेने केली आहे. परंतु प्रशासनाने अद्याप अध्यादेश काढला नसल्याचेही आमदार रघुवंशी यांनी सांगितले.