उसाला 3200 रुपयांचा भाव द्या प्रकाशा येथे ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:06 PM2017-11-07T12:06:24+5:302017-11-07T12:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : उसाला प्रती टन 3200 रुपयांचा भाव द्यावा आणि पहिली उचल तीन हजार रुपयांची द्यावी अन्यथा शेतक:यांनी जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन करीत शासनाने जर गाडय़ा अडवल्या तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. त्याचबरोबर पुष्पदंतेश्वर साखर कारखाना हा शेतक:यांचा होता तो परत मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.
प्रकाशा येथील सद्गुरू दगा महाराज धर्मशाळेच्या प्रांगणात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील पहिली ऊस परिषद झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून खासदार राजू शेट्टी बोलत होते. व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर, संघटनेचे नेते जगदीश इनामदार, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दीपक पगार, नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, धुळे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, पवन देशमुख, डोंगर पगार, कृष्णदास पाटील, पुष्पदंतेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद चौधरी, नंदुरबार बाजार समितीचे सभापती भरत पाटील, नथ्थू पाटील, उपसरपंच भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की, सरकारने परराज्यात ऊस विक्रीला बंदी केली आहे. मात्र स्थानिक कारखाने जर शेतक:यांना भाव देत नसतील तर शेतक:याला कुठेही ऊस विक्री करता आली पाहिजे. साखर विक्री देशभर होऊ शकते मग ऊस का शेतक:यांनी देऊ नये. या भागातील कारखान्यांचा उतारा कमी असल्याबाबत त्यांनी सांगितले, गु:हाळात व इतर ठिकाणी उसाचा उतारा चांगला मिळतो मग कारखान्यांना का मिळत नाही. काही कारखाने ऊस वजन चोरण्यासाठी काटा मारतात. कारखान्याची आधुनिक यंत्रणा असताना याठिकाणी नऊची रिकव्हरी व बाहेर 13 ची रिकव्हरी का मिळते, असा प्रश्न करून कारखान्यांच्या पारदर्शी व्यवहारासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही त्यांनी केली. आपण कुठल्याही पक्षाची अथवा कुठल्याही कारखान्याचा एजंट नाही तर फक्त आणि फक्त शेतक:यांची बाजू मांडण्यासाठी येथे आलेलो आहे. गुजरातमधील कारखान्यांची बाजू आपण घेणार नाहीत पण ते जर शेतक:यांना जास्त भाव देत असतील तर तेथे शेतक:यांना का ऊस देऊ नये, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतक:यांनी संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याची ठाम भूमिका मांडत त्यांनी शेतक:यांसाठी मोदी सरकारमधून बाहेर पडून सरकारला विरोध नोंदविल्याचेही सांगितले. या सरकारने आपला विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी विविध विषयांवर मत मांडत शेतक:यांसाठी सरकारशी दोन हात करण्याचा इशाराही दिला. पुष्पदंतेश्वर साखर कारखाना हा शेतक:यांचा कारखाना असून तो परत मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचा संकेत त्यांनी दिला.