चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस मालेगावी जलद गतीने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:14 AM2018-03-22T00:14:04+5:302018-03-22T00:14:04+5:30
कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मार्च रोजी ७० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीतून चोरून नेणाऱ्या आरोपी नागराजन बी. राजेंद्रप्रसाद (३९), रा. पेडीयारनगर, विलीवक्कम, चेन्नई (तामिळनाडू) यास न्यायालयाने दोषी ठरवून सात दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.
मालेगाव : कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मार्च रोजी ७० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीतून चोरून नेणाऱ्या आरोपी नागराजन बी. राजेंद्रप्रसाद (३९), रा. पेडीयारनगर, विलीवक्कम, चेन्नई (तामिळनाडू) यास न्यायालयाने दोषी ठरवून सात दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. १२ मार्च रोजी कलेक्टरपट्टा येथील रहिवासी साखरचंद दादाजी चव्हाण यांनी आयसीआयसीआय बँकेतून ७० हजार रुपयांची रक्कम काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. मोटारसायकल एलव्हीएच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लावून ते मुलास शाळेत सोडण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीचे कुलूप तोडून पैसे घेऊन पळून जात असताना पोलिसांसह काही नागरिकांनी त्यास पकडले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक संतोष तिगोटे यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्टीने तपास केला. आरोपी नागराजन राजेंद्रप्रसादविरुद्ध १७ मार्च रोजी मालेगाव न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र. २ यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यातील तपासी अधिकारी व पोलीस कर्मचाºयांनी गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्टीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तपासी अंमलदार व कोर्ट पैरवी अधिकारी यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. चोरीच्या गुन्ह्यात आतापर्यंत न्यायालयाने दिलेला हा सर्वात जलद गतीचा निकाल ठरला.