रविवार कारंजावर अतिक्रमण विरोधी मोहीम मनपाची कारवाई : ५० व्यापाºयांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:00 AM2017-12-30T01:00:34+5:302017-12-30T01:01:26+5:30
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.२९) रविवार कारंजा, बोहोरपट्टी, भांडीबाजार, दहीपूल या भागात मोहीम राबवत दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेला माल जप्त केला.
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.२९) रविवार कारंजा, बोहोरपट्टी, भांडीबाजार, दहीपूल या भागात मोहीम राबवत दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेला माल जप्त केला. यावेळी पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करण्यासंबंधीच्या नोटिसा परिसरातील सुमारे ५० दुकानदारांना बजावण्यात आल्याची माहिती पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी दिली.
महापालिकेमार्फत गेल्या दोन दिवसांपासून मेनरोड, भद्रकाली, महात्मा गांधीरोड या भागात व्यापाºयांनी आपल्या दुकानांसमोर केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र, अतिक्रमण विभागाच्या पथकाची पाठ वळताच पुन्हा विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शुक्रवारी रविवार कारंजा, बोहोरपट्टी, कापडबाजार, भांडीबाजार व दहीपूल याठिकाणी व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्याची कारवाई केली. दुकानासमोर लावण्यात आलेले गज, पाइप गॅसकटरच्या माध्यमातून कापून घेण्यात आले तर सुमारे २ ट्रक माल जप्त करण्यात आला. दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या नोटिसाही महापालिकेने बजावल्या. परिसरातील आणखी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती नितीन नेर यांनी दिली. या मोहिमेत मनपाच्या पूर्व विभागाच्या अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यासह ४० कर्मचारी सहभागी झाले होते. काही ठिकाणी विक्रेत्यांनी पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांची मात्रा चालली नाही.