बालाजी विवाह सोहळा उत्साहात
By Admin | Published: October 9, 2016 01:37 AM2016-10-09T01:37:19+5:302016-10-09T01:38:56+5:30
कुर्यात सदा मंगलम् ... : वऱ्हाडी भाविकांची झाली गर्दी
नाशिक : गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा... अशा मंगलाष्टकाच्या गजरात आणि व्यंकट रमणा गोविंदा असा जयघोष करत गंगापूर धबधबा येथील बालाजी मंदिरात भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा शनिवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शनिवारी (दि. १) ब्रह्मोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून, दररोज येथील बालाजी मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवांतर्गत शनिवारी (दि. ८) पुरोहित मयूर मेघश्याम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरज मुहूर्तावर देवी पद्मावतीशी भगवान बालाजी यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ४) लवाटेनगर येथील महालक्ष्मी मंदिरात देवीला महावस्त्र अर्पण करून लग्नाचे आमंत्रण देण्यात आले होते.
यावेळी आनंद जोशी, प्रमोद भार्गवे, राजाराम मोगल, आशिष कुलकर्णी, महेश हिरे, अशोक खोडके, हेमंत कुलकर्णी, नरेंद्र चांदवडकर आणि अवधूत देशपांडे आदि विश्वस्तांसह शहरातील विविध भागातून आलेल्या वऱ्हाडी भाविकांची यावेळी सोहळ्यासाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)