बार असोसिएशन निवडणूक : उमेदवार एका व्यासपीठावर
By admin | Published: July 9, 2017 12:33 AM2017-07-09T00:33:56+5:302017-07-09T00:34:37+5:30
नाशिक : जिल्हा न्यायालयास भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न, मोफत वायफाय अशी आश्वासने जिल्हा न्यायालयातील वकील उमेदवाांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वकील हे केंद्रबिंदू मानून त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणींच्या निराकरणाबरोबरच जिल्हा न्यायालयास भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, अद्ययावत लायब्ररी, वकीलांसाठी बार रुम, नवीन वकीलांना सोयी-सुविधा याबरोबरच न्यायालयात मोफत वायफाय अशी आश्वासने जिल्हा न्यायालयातील वकील उमेदवाांनी जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात दिली़ यावेळी काही उमेदवारांनी आपल्या कामांच्या जंत्री सादर करीत तर काहींनी भावनिक साद घालत निवडून देण्याचे आवाहन केले़
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष काक़ा़घुगे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, माजी अध्यक्ष भास्करराव पवार, माजी जिल्हा सरकारी वकील वसंत पेखळे यांनी आयोजित केलेल्या या विशेष सभेत उमेदवारांनी निवडून आल्यानंतर वकीलांच्या दैनंदिन समस्यांवरील उपाययोजनांबाबत माहिती व त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत मतदारांना माहिती दिली़ अध्यक्षपदाची उमेदवार अॅड़नितीन ठाकरे, अॅड़श्रीधर माने, अॅड़महेश अहेर, अॅड़अशोक आव्हाड, अॅड़झुंझार आव्हाड अॅड़विजय मोरे यांच्यासह सर्व पदांसाठी उमेदवारी करणाऱ्या वकीलांनी निवडून देण्याचे आवाहन केले़ अध्यक्षपदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांकडून प्रामुख्याने पार्किंगचा प्रश्न, पोलिसांकडून मिळालेले जागेवर तयार होणाऱ्या इमारतींमध्ये वकीलांसाठी बाररुम, वकीलांसाठी विमा, महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, नवीन वकीलांसाठी स्टायपेंड, वकीलांसाठी नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन, न्यायाधीशांकडून केले जाणारा अपमान, तारखा, बार रुम, लायब्ररी या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली़ तर काहींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत बदल घडविण्याची तसेच सक्षम नेतृत्वाची आवश्यकता विशद केली़ बार असोसिएशनच्या निवडणुकीत उमेदवारांनी टिकाटिप्पणीबाबत विद्यमान अध्यक्षांनी चांगलीच टिप्पणी केली़ बारने वकीलांसाठी विविध योजना, पार्किंगच्या प्रश्नातील खो, आयएसओ मानांकन, नवीन जागेसाठी केलेले प्रयत्न याबाबत खुलासे केले़ यावेळी विद्यमान अध्यक्ष व अध्यक्षपदावरील उमेदवारांबाबत शब्दिक चकमक व असंसदीय शब्दाचा वापरही करण्यात आला़ जिल्हा न्यायालयातील वकीलांची संघटना नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत़ या निवडणुकीत ५६ उमेदवार रणांगणात असून मतदारसंख्या ३ हजार ५६ इतकी आहे़ उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडीया वापराबरोबरच पत्रकांद्वारे संवाद साधला जातो आहे़