उज्ज्वल गोशाळेत जनावरांची जोपासना
By admin | Published: May 30, 2016 10:50 PM2016-05-30T22:50:57+5:302016-05-30T23:07:05+5:30
पिंपळगाव बसवंत : प्रीतिसुधाजी म.सा. यांचे मार्गदर्शन
पिंपळगाव बसवंत : येथील उज्ज्वल गोशाळा ही जनावरांची आधार संस्था बनली असून, शेकडो जनावरे या ठिकाणी अतिशय काळजीने जोपासली जात आहेत.
प.पू. प्रीतिसुधाजी महाराज यांच्या संकल्पनेतून उज्ज्वल गोरक्षण संस्थेची ९ डिसेंबर २००६ रोजी स्थापना करण्यात आली. पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन व स्व. अशोक बनकर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने या गोशाळेची स्थापना झाली. उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही याठिकाणी जनावरांची खूप चांगल्या प्रकारे निगा राखली जाते.
आज याठिकाणी ३६० गायी, १८० बैल व गोऱ्हे, ८ म्हशी, ७५ अपंग जनावरे आहेत. ७५ वासरे आई नसतानादेखील दुसऱ्या गायींच्या दुधावर मोठी करण्यात आली.
या गोशाळेत अजून दोन गायी अशा आहेत की त्यांची उंची चार फूट आहे. राजस्थानमध्ये आढळणाऱ्या या रानगायी आहेत. याठिकाणी सध्या पाण्याची टंचाई जरी जाणवत असली तरी बाजार समितीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर पुरविले जात असून, पिंपळगावचे सर्व कांदा व्यापारी हे आपल्या कुटुंबाची ज्याप्रकारे काळजी घेतात त्याप्रमाणे या गायींची काळजी घेत आहेत. गोशाळेमार्फत शेतकऱ्यांना अल्प मोबदल्यात शेतीकामासाठी बैल देण्यात येतात.
येथे जनावरांची पाण्याची वेगळी व्यवस्था व वासरांची वेगळी व्यवस्था करण्यात आली असून, रोजच्या रोज या ठिकाणी डॉक्टर्सकडून जनावरांची तपासणी करण्यात येते. इतकेच नव्हे तर जनावरांसाठी रोज सकाळी व संध्याकाळी गायत्री मंत्र, ओमकार मंत्रासह भक्तिगीते लावली जातात. या गोशाळेसाठी १८ माणसे काम पाहत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शेकडो जनावरांचा सांभाळ करणारी ही गोशाळा आजही दिमाखात उभी आहे. (वार्ताहर)