चटर्जी पिता-पुत्राचे तबलावादन
By admin | Published: December 17, 2015 12:26 AM2015-12-17T00:26:48+5:302015-12-17T00:29:42+5:30
संगीत समारोह : अविराज तायडे यांच्या सुरावटीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
नाशिक : धा धिन् धिन् धा असा तीन तालाचा ठेका धरत कोलकात्याचे प्रसिद्ध तबलावादक पं.अनिंदो चटर्जी आणि त्यांचे चिरंजीव अनब्रुत चटर्जी यांनी पं. भानुदास पवार स्मृती संगीत समारोह कार्यक्रमात तबलावादनाचे सादरीकरण केले. बुधवारी (दि.१६) महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या संगीत समारोह कार्यक्रमात यानंतर चटर्जी यांनी दिल्ली, पंजाब घराण्यातील कायदे सादर करत उपस्थित कलाकारांची दाद मिळवली.
एसडब्ल्युएस संस्था आणि पवार तबला अकादमी, नाशिक यांच्यातर्फे या संगीत समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर फारूखाबाद घराण्यातील चटर्जी यांनी आपल्या नादमय आणि ओघवत्या शैलीत श्रवणीय तबलावादनाचा अनुभव रसिकांना दिला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना अनोखी लग्गी पेश करत चटर्जी यांनी ही मैफल अधिकच खुलवली. यानंतर गद्दे, टुकडे आणि चलन यांचे सादरीकरण करण्यात आले. अनिंदो चटर्जी आणि अनब्रुत चटर्जी यांना फारूख लतिफ (सारंगी), प्रशांत महाबळ (संवादिनी) यांनी साथ संगत केली.
सुरुवातीला गायक अविराज तायडे यांचे गायन सादर करण्यात आले. आपल्या गायनाची सुरुवात तायडे यांनी यमन रागातील ‘मेरा मन बांध लीनो’ ही विलंबित तालातली बंदिश सादर केली. अविराज तायडे यांना नितीन पवार (तबला), सुभाष दसककर (संवादिनी) आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार आणि आरोह ओक यांनी तानपुऱ्यावर स्वरसाथ केली. पं.भानुदास पवार स्मृती संगीत समारोह कार्यक्रमाला दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. यावेळी एस.टी.पाटील, एसडब्ल्युओचे अध्यक्ष रघुवीर अधिकारी, दीपक कुलकर्णी, मनीषा अधिकारी, नितीन पवार, अविराज तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.