सिडकोतील युवकाचे अपहरण करून खून
By admin | Published: November 2, 2016 11:21 PM2016-11-02T23:21:49+5:302016-11-02T23:22:24+5:30
केवडीबन : भांडणाची कुरापत; मारेकऱ्यांमध्ये पोलीसपुत्राचा समावेश
नाशिक : मागील भांडणाच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच एका मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना सोमवारी (दि़ ३१) रात्रीच्या सुमारास केवडीबनातील नवीन शाहीमार्ग परिसरात घडली़ मयूर नरेंद्र देवरे (१९, रा़ खंडेराव चौक, जुने सिडको, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच संशयितांविरोधात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, या खुनामध्ये पोलीस आयुक्तालयातील पोलीसपुत्राचा समावेश असल्याचे समोर आले आहे़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काठेगल्ली परिसरात सोमवारी (दि़ ३१) सायंकाळी सांज पाडवा कार्यक्रमासाठी मयूर देवरे, सर्वेश पवार व त्यांचे मित्रमंडळी जमले होते़ तेथील संशयित अक्षय ऊर्फ बिटू काळोगे, शुभम ऊर्फ नन्नू शर्मा, मयूर शेलार, दीपक ठाकरे व जुनीन सय्यद हे देवरे व पवार या दोघांनाही बळजबरीने म्हसरूळ टेक परिसरातील बंडू वस्ताद तालीम परिसरात घेऊन गेले़ या दोघांशी वाद घातल्यानंतर सर्वेश पवारची दुचाकी व मोबाइल बळजबरीने काढून घेत मयूर देवरेला बळजबरीने दुचाकीवर बसवून तपोवन परिसरात घेऊन गेले़
तपोवन परिसरात नेल्यानंतर संशयितांनी मयूरसोबत पुन्हा वाद घालून त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकचा गट्टू मारला तसेच चामडी बेल्टने गळा आवळून त्याचा खून केला व पसार झाले़. याप्रकरणी मयूरचे वडील नरेंद्र उत्तमराव देवरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार संशयितावर अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन श्वानपथकाद्वारे संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांचा शोध लागला नसून शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत़
दरम्यान, देवरे खून प्रकरणी पोलिसांनी आणखीन काही संशयितांची चौकशी केली़ तसेच या मारेकऱ्यांमधील संशयित अक्षय काळोगेचे वडील पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी आहेत़ (प्रतिनिधी)
व्ही़एऩ नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थी
सिडकोतील खंडेराव चौकात राहणारा मयूर देवरे हा व्ही़एऩ नाईक महाविद्यालयात चौदावीला होता़ एकुलता एक असलेल्या मयूरच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे़