धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:21 AM2018-05-14T00:21:24+5:302018-05-14T00:21:24+5:30
सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नाशिक : सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे २६०० स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन ५६ टन कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, आरोग्य जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजामध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरात सिडको, इंदिरानगर, पंचवटी, अशोकनगर, सातपूर, नाशिकरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलनीरोड आदी ठिकाणी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंचवटी परिसरात या मोहिमेचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते तर सिडको परिसरात आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेवक रत्नमाला राणे, श्याम बडोदे, अरुण पवार, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, दिनकर आढाव, रंजना बोराडे, प्रकाश बोराडे, सुप्रिया खोडे, पुष्पा आव्हाड, अनिल ताजनपुरे, सुवर्णा मटाले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
विविध शासकीय कार्यालय परिसरात साफसफाई
नाशिक शहरातील मुख्य रस्ते, तसेच विविध शासकीय कार्यालये येथे सकाळी ७.३० ते ११ या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत सुमारे अडीच लाख चौरस मीटर क्षेत्रफळ आणि १११ कि.मी. लांबीचे रस्ते व परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत ५६ टन कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यात २६१४ सदस्यांनी सहभाग घेतला. नाशिक शहराप्रमाणेच जिल्ह्यात त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, सटाणा, येवला आदी नगरपालिका हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानासाठी महापालिका व नगरपालिका यांचे सहकार्य लाभले.