माकप कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयाला घेराव
By admin | Published: February 1, 2017 01:41 AM2017-02-01T01:41:32+5:302017-02-01T01:41:50+5:30
माकप कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयाला घेराव
पेठ : तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी प्रक्रि या गेल्या कित्येक महिन्यांपासून थांबलेली असल्याने शेकडो लाभार्थींनी थेट तहसील कार्यालयात ठाण मांडून आमची प्रकरणे दाखल करून घेण्याबाबत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. जिल्हा परिषद पंचायत समितीची धामधूम सुरू असताना व प्रशासनही निवडणूक कामकाजात गर्क असताना सोमवारी दुपारी येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो लाभार्थींनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. आमदार जे. पी. गावित यांनी यावेळी बोलताना संजय गांधी योजनेची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित ठेवण्याच्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनास जाब विचारल्याने प्रशासनाचीही भंबेरी उडाली. निवडणुकीचे पडघम वाजू लागताच माकपने जनसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नास हात घालून निवडणूक पूर्वीची झलक दाखवून दिल्याने प्रतिपक्षातर्फेया प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून निवडणुकीचा स्टंट असल्याची प्रतिक्रि या व्यक्त केली. आमदार गावित यांनीच मध्यस्थी करून व नागरिकांची समजूत घालून तसेच प्रशासनास सूचना देऊन प्रशासनापुढील पेच सोडविला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.