गणपती मंडळांचे देखावे पूर्णत्वास
By admin | Published: September 9, 2016 01:18 AM2016-09-09T01:18:29+5:302016-09-09T01:19:29+5:30
चलचित्रांना पसंती : धार्मिक, सामाजिक विषयांवर भर
नाशिक : शहरातील विविध गणपती मंडळांमध्ये गणरायांच्या आगमनानंतरही सुरू असलेले देखाव्यांचे काम पूर्णत्वास आले असून, काही मंडळांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते पूर्ण केले. शहरात दुपारच्या सुमारास परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले असले तरी संध्याकाळी मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अखेरच्या टप्प्यातील देखावे, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे पूर्ण केली.
गणेशोत्सव मंडळांनी यंदा धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर भर दिला असून, हिंदी-मराठी चित्रपटांतील पात्रांचाही देखाव्यांमध्ये समावेश केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे, आरास व विद्युत रोषणाई विशेष कारागिरांकडून करून घेतली आहे. मेनरोड परिसरातील अनमोल मेनरोड मित्रमंडळाने केलेला जेजूरी गडाचा देखावा, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा संत तुकाराम महाराजांचा भक्तीचा मेळा, टिळकपथ परिसरातील नामको बँकेच्या आवारात साईदरबाराचा देखावा यांसह यंदाच्या गणपती उत्सवात विविध मंडळांनी समाजप्रबोधनावरही भर देत स्त्रीभ्रूण हत्त्या, शहरातील वाढती गुन्हेगारी, पर्यावरण संवर्धन आदि विषयांवर देखावे तयार केले आहे. काही मंडळांनी शिवकालीन इतिहासाचे चलचित्र देखाव्यात साकारले आहे. जय मल्हार मालिकेसह रामायण, महाभारतातील चलचित्र देखाव्यांना भाविकांकडून पसंती मिळत आहे. यात संत ज्ञानेश्वर, राधा-कृष्ण, मीरा, सीता-राम आणि लक्ष्मण यांचा वनवास, पंढरीचे वारकरी आदि धार्मिक देखावे पाहण्यासाठी नाशिककर बाहेर पडत आहेत; मात्र दुपारच्या पावसाने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडल्याने तुलनेत भाविकांची गर्दी कमी असली तरी शनिवारी व रविवारी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात निश्चितच पहायला मिळेल, अशी खात्री गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)