सहकारी सोसायटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By admin | Published: June 19, 2014 12:15 AM2014-06-19T00:15:35+5:302014-06-19T00:57:06+5:30
नाशिक : जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज शहरातून मोर्चा काढला़ उपनिबंधक कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले़
नाशिक : ‘सहकारी संस्था वाचवा सहकार वाचवा’ अशा घोषणा देत जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज शहरातून मोर्चा काढला़ उपनिबंधक कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले़
गावपातळीवर काम करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या वाचविण्यासाठी कर्जवाटपावर तीन टक्के अनुदान द्यावे, यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियन व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ बी़ डी़ भालेकर मैदान येथून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चास प्रारंभ झाला़ शालिमार चौक, प़सा़ नाट्यगृह, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला़ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा त्र्यंबक नाका, गंजमाळ, सारडा सर्कल मार्गे जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडकला़ परंतु या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यास कोणीही अधिकारी नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी अधिकारी येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला़ सुमारे एक तास आंदोलन केल्यानंतर अखेर उपनिबंधक आहिरे यांनी निवेदन स्वीकारले़ मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ निकम, राजू देसले, भगीरथ शिंदे, राजाराम रायते, बाळासाहेब पवार, पोपट राजोळे आदिंसह सुमारे चारशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़