प्रचार साहित्यातील कलाकृतीला मागणी

By admin | Published: February 19, 2017 01:06 AM2017-02-19T01:06:48+5:302017-02-19T01:07:01+5:30

खरेदीसाठी गर्दी : झेंडे, मफलर, टोप्या वैविध्यपूर्ण साहित्याला पसंती

Demand for artwork in publicity literature | प्रचार साहित्यातील कलाकृतीला मागणी

प्रचार साहित्यातील कलाकृतीला मागणी

Next

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांच्या नेत्यांकडून तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांविरोधात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते शहरातील निवडणूक प्रचार साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये एकत्र खरेदी करताना दिसतात. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या नऊ दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे विविध प्रचार साहित्यांच्या दुकानांमध्ये प्रचार साहित्य खरेदी करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.  शहरातील प्रचार साहित्याच्या विविध दुकानांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचार साहित्याची शेजारी शेजारी मांडणी करण्यात आली आहे. प्रचार साहित्याची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना एका दृष्टिक्षेपात कोणत्या गोष्टी घ्यावयाच्या आहेत हे ध्यानात येते. प्रचार साहित्याची मागणी नोंदविणाऱ्या पक्षात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांसह रिपाइं, सपा व अपक्ष उमेदवारांनीही प्रचार साहित्य खरेदीसाठी जोर धरला आहे. राज्यातील प्रमुख पक्षांचे झेंडे, पक्षांची उपरणी, नेत्यांच्या प्रतिमा असलेली पदके, कापडी आणि मलमली बॅनर अशा साहित्याचा यात समावेश असून उमेदवारांसाठी तसेच कार्यकर्त्यांसाठी फेटे, त्याच्या जोडीला शाही मलमली उपरणे असा संच एकत्रितपणे उपलब्ध आहे. पक्ष कोणताही असो, त्या पक्षाच्या झेंड्यापासून ते अगदी पक्षाचे चिन्ह असलेल्या शर्टच्या बटणापर्यंत प्रचाराचे सर्व साहित्य शहरातील विविध दुकानांमध्ये उपलब्ध आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य पुरविले जाते. परंतु पक्षाकडून मिळणारे साहित्य कार्यकर्त्यांना पुरेसे नसते. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळ्या आकाराचे आणि आकर्षक प्रचार साहित्याचे वाटप करीत असल्याने आपण मागे पडायला नको म्हणून निवडणुकीच्या रिंगनात उतरलेल्या सर्वच पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांकडून प्रचार साहित्याच्या खरेदीला गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)
प्रचार साहित्यात निवडणुकीत मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमच्या प्रतिकृतीचीही खरेदी करण्यात येत आहे. या मतदान यंत्राच्या प्रतिकृतीच्या साह्याने मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीसह उमेदवाराला मतदान कशाप्रकारे करावयाचे याचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात येते. त्यामुळे प्रचार साहित्यात अशा ईव्हीएम प्रतिकृतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुमारे पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत या यंत्राची एक प्रतिकृती मिळत असली तरी उमेदवार आवर्जून अशा प्रतिकृती खरेदी करीत आहेत. त्याचप्रमाणे साडीच्या काठावरील ‘पक्षचिन्ह’, ‘पक्ष चिन्हाची की-चेन’, फुगे, विविध पक्षांच्या झेंड्यांच्या रंगांची किनार आणि नेत्यांची छबी असलेले फेटे वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, पदक (बिल्ले), विविध प्रकारची उपरणी, कापडी आणि मलमली बॅनर या साहित्यालाही मागणी वाढू लागली आहे.

Web Title: Demand for artwork in publicity literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.