दूरसंचारची सेवा सुरळीत करण्याची मागणी
By admin | Published: July 25, 2014 11:31 PM2014-07-25T23:31:51+5:302014-07-26T00:51:16+5:30
निवेदन सादर : चांदवड, देवळा तालुक्यांतील ग्राहक त्रस्त
चांदवड : चांदवड व देवळा तालुक्यांतील भारत दूरसंचार व ब्रॉडबॅण्ड सेवा सुरळीत करावी, अशी मागणी भारत संचार निगमचे राज्य जनरल मॅनेजर महेंद्रकुमार जैन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारत संचार निगम मर्यादित ही सर्वांत मोठी कंपनी असून, चांदवड व देवळा तालुक्यांत या कंपनीचे अनेक ग्राहक आहेत. वारंवार दूरध्वनी व इंटरनेट सेवेत अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे या ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी सिग्नल टॉवर नसल्यामुळे नवीन फोन जोडणी व इंटरनेट सुविधा मिळू शकत नाही. चांदवड शहराच्या बाहेरील ठिकाणी व तालुक्यातील कन्हेरवाडी, बोराळे, तळेगाव, कातरवाडी आदि गावांत भारत संचारची गरज असून, सुविधा मिळत नाही.
भारत संचार निगमच्या ग्राहकांना त्यांच्या दूरध्वनी, मोबाइल व ब्रॉडबॅण्ड इंटरनेटमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत संबंधित कार्यालयात तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र त्याचा उपयोग झाला नाही याकडे संबंधितांना त्वरित लक्ष देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी हे निवेदन दिले आहे. (वार्ताहर)