डेंग्यूचा ससेमिरा कायम ; रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:56 PM2017-11-26T23:56:13+5:302017-11-27T00:36:22+5:30
शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून, नोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर संशयितांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली आहे. डेंग्यूचा ससेमिरा कायम असल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे.
नाशिक : शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून, नोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर संशयितांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली आहे. डेंग्यूचा ससेमिरा कायम असल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ३० ते ३५ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभाग करत असला तरी डेंग्यू आजाराने बाधित झालेल्या संशयित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होताना दिसून येत आहे. शहरात आॅगस्टमध्ये ९७ डेंग्यूचे रु ग्ण सापडले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या १०५ वर जाऊन पोहोचली होती. आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर संशयित डेंग्यू रुग्णांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला. आता १ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत संशयित रुग्णांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली असून, १८१ रुग्णांना लागण झालेली आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. प्रामुख्याने, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. संबंधित रुग्णालयांना डेंग्यूच्या आजाराने बाधित दाखल रुग्णांची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक रुग्णालये त्याबाबतची माहिती कळवत नसल्याने वैद्यकीय विभागाने नोटिसा बजावण्याची तयारी चालविली आहे.
प्लेटलेट्सला मागणी
डेंग्यूच्या रुग्णामध्ये रक्तातील प्लेटलेट््सची संख्या कमालीची घटत असते. सर्वसाधारणपणे २० हजारांच्या आत प्लेटलेट्स आल्यास रुग्णाच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. सद्यस्थितीत शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सला मागणी वाढली आहे. प्लेटलेट्सच्या पिशव्यांची किंमत ही १० हजारांच्या पुढे जात असल्याने डेंग्यूचा उपचार महागडा ठरू लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत गजानन शेलार यांनी डेंग्यूच्या रुग्णांना महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती.