जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:07 AM2018-07-25T01:07:50+5:302018-07-25T01:08:05+5:30
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध मराठा संघटनांनी बुधवारी (दि़२५) बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे़ संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ६ वाजेपासून हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ नाशिक शहरात पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त आपापल्या भागामध्ये लक्ष ठेवून असणार आहे़ शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त लावण्यात आला असून, बसडेपो, अत्यावश्यक सेवा, नदीवरील पूल या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ याबरोबरच शहरातील मुख्य चौकात पॉर्इंट तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात असणार आहे़ याबरोबरच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तैनात असणार आहे़
नाशिक ग्रामीणमध्येही बंदोबस्तही तैनात करण्यात आले असून, ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट, पेट्रोलिंग, महामार्गावर स्ट्रायकिंग ठेवण्यात आले आहेत़ याबरोबरच दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाची एक प्लाटून तैनात असणार आहे़ दरम्यान, कायदा सुव्यवस्था तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे़