आरबीआयचा ग्राहकांना थेट संदेश : रुपयाचे चिन्ह असलेले-नसलेले दोन्ही नाणे वैध दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भातील संभ्रम संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:29 AM2018-02-04T01:29:30+5:302018-02-04T01:30:15+5:30
नाशिक : सध्या देशभरात दहा रुपयांची नाणी विविध प्रकारांत उपलब्ध होत असल्याने त्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
नाशिक : सध्या देशभरात दहा रुपयांची नाणी विविध प्रकारांत उपलब्ध होत असल्याने त्याविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची दहा रुपयांची नाणी वैध असून, ती चलनात कायम असल्याचे संदेश रिझर्व्ह बँकेकडून ग्राहकांना पाठवले जात असून, या माध्यमातून ग्राहकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आरबीआयने केला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेतर्फे विविध डिझाइनची नाणी जारी करण्यात आल्यामुळे दहा रुपयांच्या नाण्यात विविधता आल्याचेही या संदेशाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे दहा रुपयांच्या जारी करण्यात आलेल्या नाण्यांमध्ये संसद भवन, मध्यभागी १० आकडा असलेले नाणे, होमी भाभा यांचे छायाचित्र असणारे नाणे, महात्मा गांधी यांचे छायाचित्र असणाºया नाण्यांसह सर्व प्रकारची नाणी वैध आहेत. त्यांचा बाजारात उपयोग करण्यास काहीच हरकत नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्यवहारादरम्यान दहा रुपयांच्या नाण्यांबाबतीत वाद निर्माण होत असल्याचे प्रसंग घडल्याचे समोर येत आहेत.
नोटांपेक्षा नाण्यांवर भर
आतापर्यंत विविध प्रसंगांनुसार रिझर्व्ह बँकेने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक थीमवर नाणी जारी केली आहेत. २०११ मध्ये बँकेने रु पयाच्या चिन्हाचा नाण्यावर अंतर्भाव करण्यास सुरु वात केली. नोटांच्या तुलनेत नाण्यांचे आयुष्य अधिक असल्याने आरबीआयतर्फे अधिकाधिक नाणी सादर करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेल्या या चलनावरील साशंकतेचे मळभ आरबीआयच्या खुलाशामुळे झटकले गेले आहे.