पाऊस थांबल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:11 AM2018-07-24T01:11:44+5:302018-07-24T01:12:02+5:30
रविवारी अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळनंतर दिवसभर उघडीप दिल्याने त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे.
नाशिक : रविवारी अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी सकाळनंतर दिवसभर उघडीप दिल्याने त्याचबरोबर धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे.
गेल्या सोमवारपासून गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जात असून, त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाच्या क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे धरणात ७७ टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यात कितीही पाऊस पडला तरी, गंगापूर धरणाची सुरक्षितता लक्षात घेता ७५ टक्केच जलसाठा ठेवता येतो, त्यामुळे गेल्या सोमवारी ९३०२ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सलग तीन दिवस करण्यात आला, त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने त्यात कपात करण्यात आली. मात्र शुक्रवारपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली होती.
रविवारी धरणातून ५९३१ क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीला पूर येऊन दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी पोहोचले
त्यामुळे गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठावरील व्यावसायिकांनी तेथून काढता पाय घेतला होता. तथापि, रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरताच, पाटबंधारे खात्याने विसर्गात कपात केली. सोमवारी दुपारनंतर २४९६ क्यूसेक पाणी सोडण्यात आले, त्यामुळे पूर ओसरण्यास मदत झाली आहे. सायंकाळी मारुतीच्या गुढग्यापर्यंतच पाणी होते. त्यामुळे रामकुंडाच्या बाजूच्या व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्ववत सुरू ठेवले होते.
स्नानाला मुकले
गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त गोदावरीत दरवर्षी स्नानासाठी येणाºया भाविकांची गैरसोय झाली. गोदावरीचे पाणी वस्त्रांतरगृहाच्या पायºयांपर्यंत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस व महापालिकेकडून या भागात भाविकांना जाण्यास मज्जाव करीत होते. त्यामुळे अनेक भाविकांना काठावरच कसेबसे स्नान उरकावे लागले.