महाकाली चौकात कुरापत काढून एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:34 AM2018-09-11T00:34:46+5:302018-09-11T00:35:05+5:30
कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून त्याच्या पाठीत काच मारल्याची घटना पवननगरमधील महाकाली चौकात घडली आहे़
नाशिक : कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून त्याच्या पाठीत काच मारल्याची घटना पवननगरमधील महाकाली चौकात घडली आहे़ शिवतिर्थ चौकातील रहिवासी विनोद काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास संशयित गण्या बुट्या, भूषण केदारे व बोंबल्या यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली़ यानंतर या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काळेच्या पाठीत बाटलीची काच मारून जखमी केले़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
गणेश चौकात तरुणास मारहाण अल्पोपहारासाठी सिडकोतील गणेश चौकात गेलेल्या मुंबईतील तरुणास चौघांनी बेदम मसरहाण केल्याची घटना रविवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़ मुंबईतील मालाड येथील रहिवासी ऋतिक शिंदे हा मित्रांसह गणेश चौकातील नास्टा करण्यासाठी गेला होता़ यावेही हात धुण्यासाठी तो गेला असता संशयित नीलेश मोरे व त्याच्या तिघा साथिदारांनी शिंदे यास बेदम मारहाण केली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
विहितगाव येथून दुचाकीची चोरी
विहितगावच्या हांडोरी मळ्यातील रहिवासी मनोज चौहान यांची २० हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच १९, एएन ३७४४) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
घराच्या टेरेसवर बोलत असलेल्या तरुणीचा विनयभंग
घरातील टेरेसमध्ये मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणीचे तोंड दाबून विनयभंग करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़९) सायंकाळी घडली़ पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून ती टेरेसवर फोनवर बोलत होती़ यावेळी एक पांढरा शर्ट घातलेला एक संशयित तिथे आला व त्याने या तरुणीचे डोळे व तोंड घट्ट दाबले़ या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा-ओरड करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिच्या पायावर पाय देऊन दुखापत केली व फरार झाला़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोत दुचाकीवरील चौघा संशयितांनी एकास लूटले
देवदर्शनानंतर घरी परतणाऱ्या इसमास दुचाकीवरील चौघा संशयितांनी रस्त्यात अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याचे चेन बळजबरीने काढून घेतल्याची घटना सिडकोत घडली़ सिडकोतील महाले फार्मजवळील लक्ष्मीनगरमध्ये गौतम सोळंके राहतात़ रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास शनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नगरसेवक महाले यांच्या संपर्क कार्यालयासमोरील रस्त्याने घरी परतत होते़ यावेळी अॅक्टिवा व पल्सर दुचाकीवरून चौघे संशयित आले व त्यांनी धक्का देऊन सोळंके यांना खाली पाडले़ यानंतर या चौघांनी जबर मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील ३७ हजार ५०० रुपये किमतीची दीड तोळे सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात साळुंके यांच्या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.