गणेशोत्सवात इको फ्रेंडली पिशव्यांची ‘ऊर्जा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:53 AM2017-08-30T00:53:52+5:302017-08-30T00:53:57+5:30
आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जाणारे निर्माल्य रोखण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले. त्यासाठी हजारो इको फ्रेण्डली पिशव्या शाळाशाळांमधून घरोघरी पोहचविण्यास सुरुवात झाली.
आपलं नाशिक अन् माझ्या नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने २००७ साली एका लोकप्रतिनिधीने तत्कालीन उपमहापौर असताना ‘ऊर्जा’ नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाखो नाशिककरांच्या घरातून नदीपात्रात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये जाणारे निर्माल्य रोखण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले. त्यासाठी हजारो इको फ्रेण्डली पिशव्या शाळाशाळांमधून घरोघरी पोहचविण्यास सुरुवात झाली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून मागील दहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ अखंडितपणे शहरात राबविली जात आहे. प्रतिष्ठानचे सुमारे दोनशेहून अधिक स्वयंसेवक या चळवळीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत योगदान देतात. केवळ पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यापर्यंतच हे प्रतिष्ठान थांबले नाही, तर भावी पिढीच्या हातातून गणराय कसे घडतील, हा वेगळा विचार केला गेला आणि तत्काळ मागील चार ते पाच वर्षांपासून मनपा व खासगी मराठी माध्यमांच्या शाळांमधून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचा उपक्रम हाती घेतला. हा उपक्रमदेखील दरवर्षी विविध शाळांमधून ‘ऊर्जा’चे स्वयंसेवक राबविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. यामुळे मुलांच्या बौद्धिक विकास होऊन त्यांच्या क लागुणांनाही वाव मिळतो आणि मातीपासून मूर्ती तयार करताना त्यांचा त्या मूर्तीवर जीवही जडतो, त्यामुळे बालगोपाळ हट्ट धरून पालकांना घरी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी करतात, हे अलीकडे दिसून येत असल्याचे बोरस्ते म्हणाले. यामुळे बहुतांश नाशिककरांच्या घरी शाडूमातीच्या गणरायाची प्रतिष्ठापना होऊ लागली आहे. निर्माल्य संकलन पिशव्या वाटपासोबत निर्माल्य संकलन केंद्रही अनंत चतुर्दशीला स्थापन केले जाते. केंद्रावर संकलित झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग राबविला जातो.