देशमानेकरांची आर्थिक फसवणूक
By admin | Published: January 17, 2017 01:22 AM2017-01-17T01:22:41+5:302017-01-17T01:23:04+5:30
आॅनलाइन नोंदणी : घरे, इमारतींच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
येवला : तालुक्यातील देशमाने खुर्द व बुद्रूक येथील घरे, इमारती, कृषक, अकृषक यांची आॅनलाइन नोंदणीच्या नावाखाली होत असलेली आर्थिक फसवणूक थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दुघड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. देशमाने बुद्रूक व खुर्द या गावात अहमदनगर येथील संस्थेमार्फत ग्रामपंचायत हद्दीत व अंतर्गत असणाऱ्या मालमत्ता कर आकारणीसाठी सर्व्हे करण्यात येत असून, हा सर्व्हे करणाऱ्यांकडून कर आकाराणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मालमत्ता कर आकारण्याचा अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ४ नुसार ग्रामपंचायतीला असतानादेखील वैयक्तिक पातळीवर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी संगनमताने कराच्या पावत्या छापून प्रत्येक घर, इमारत, बखळ जागा, कृषक, अकृषक जागा आॅनलाइन मोजणी नोंदवून प्रत्येकी १०० रुपये जमा करण्याचा सपाटा लावला असून, फेररिव्हिजन पावतीवर सामान्य पावती नमुना नं ८, घर नंबर, दिनांक, गट नंबर, मालमत्ताधारकाचे नाव, तर पुढील प्रमाणे कर आकारणी करण्यात आलेली आहे. यामध्ये मेहनताना कर ४० रु पये, नोंद कर ४० रु पये, आकारणी कर ३० रु पये प्रमाणे अनधिकृतपणे रक्कम जमा केली जात असून, यात शासनाला कुठलाही कर भरला जात नाही. याबाबत देशमाने येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता हा सर्व्हे शासनाच्या निर्णयावरून होत असल्याचे सांगितले होते. मात्र जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत चौकशी केली असता त्यांनी तत्काळ याच्याशी प्रशासनाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे. देशमाने बुद्रूक व खुर्द या गावातील घरांची संख्या, बखळ जागा, कृषक, अकृषक सर्व मिळून दोन हजार पावत्या नागरिकांना वाटण्यात आल्या असून, गावातून एकूण दोन लाख रु पयांची रक्कम जमा केली आहे. . (वार्ताहर)