नाशिक शहरात स्मार्ट सिटी अभियानात सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी उद्योजकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:45 PM2018-01-04T15:45:20+5:302018-01-04T15:47:31+5:30
स्मार्ट सिटी : शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव
नाशिक - स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि सर्वात जुने असलेल्या शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासासाठी आरसेलर-मित्तल ही कंपनी पुढे आली असून तसा प्रस्ताव कंपनीला देण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना झालेली आहे. कंपनीकडे आतापर्यंत केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून सुमारे ३८३ कोटी रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. कंपनीने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत रेट्रोफिटींग अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन आणि नेहरु उद्यानाच्या पुनर्विकासाची कामे हाती घेतली असून मार्च २०१८ अखेर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गावर स्मार्ट रोड साकारण्यासाठीही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. एकीकडे कंपनीमार्फत प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच काही शिक्षण संस्था, उद्योजक, कारखानदारही सीएसआर अंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात प्रामुख्याने, शहरातील सर्वात जुन्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानाचा समावेश आहे. शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाठी आरसेलर या युनाटडेड किंगडममधील कंपनी तसेच मित्तल या भारतीय कंपनीने संयुक्तरित्या प्रस्ताव महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडे दिलेला असून त्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती थविल यांनी दिली. याशिवाय, अशोकस्तंभ येथील वाहतूक बेट सुशोभिकरणासाठी संदीप फाऊण्डेशन, सीबीएस येथील चौक सुशोभिकरणासाठी नाशिक फर्स्ट तर त्र्यंबकनाका येथील चौक सुशोभिकरणासाठी विंचूरकर डायग्नोस्टिक यांनी उत्सुकता दाखविली आहे. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती थविल यांनी दिली.
योगदान देण्यास उत्सुक
नाशिक महापालिकेने गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात सीएसआर अंतर्गत नेहरु उद्यानात वनौषधी उद्यान, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, होळकर पुलावर वॉटर कर्टन, संगीत कारंजा, उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण तसेच बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हे उपक्रम साकारले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा काळातही अनेक वाहतूक बेटांचे सुशोभिकरण सीएसआर अंतर्गत झालेले आहे. शहराचा बदलणारा चेहरामोहरा पाहता आणखीही उद्योजक, कारखानदार, बॅँका सीएसआर अंतर्गत आपले योगदान देण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.