कृष्णनगरमधील घटना : पत्ता विचारण्याचा बहाणा; संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद साडेसहा लाखांची रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:46 AM2018-01-31T00:46:01+5:302018-01-31T00:46:44+5:30
पंचवटी : गॅस गुदामात काम करणाºया व्यवस्थापकाच्या दुचाकीला लाथ मारून डिकीतील साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.३०)घडली़
पंचवटी : येथील तपोवन कॉर्नरवरील एच. जोशी ब्रदर्स गॅस गुदामात काम करणाºया व्यवस्थापकास पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्याच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्यानंतर डिकीतील साडेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास श्रीकृष्णनगर उद्यानाजवळ घडली़ गणेशवाडी येथील रहिवासी सतीश साळी (६०) हे गॅस वितरक एजन्सीकडे व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास साळी हे वितरकाकडे जमा झालेली सहा लाख ४४ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीच्या डिकीत ठेवून बँकेत भरण्यासाठी निघाले़ श्रीकृष्णनगर उद्यानाजवळील रस्त्याने जात असताना गतिरोधक असल्याने साळी यांनी दुचाकीचा वेग कमी केला़ यावेळी राखाडी रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी साळी यांना पंचवटी पोलीस ठाण्याचा पत्ता विचारला व साळी यांच्या दुचाकीला लाथ मारली़ साळी हे जमिनीवर पडले असता संशयितांनी दुचाकीची चावी काढून डिकीतील सहा लाख ४४ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग काढून पळ काढला़ या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले असून, दोघेही संशयित हे २२ ते २५ वयोगटातील आहेत़
संशयित माहीतगारच?
तपोवन कॉर्नर येथील गॅस वितरकाकडे कामाला असलेले साळी हे बँकेत रोकड भरण्यासाठी जात असल्याची माहिती संशयित आरोपींना माहिती असल्याने संशयित हे माहीतगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. साळी हे बँकेत कधी जातात याची पाळत ठेवून संशयितांनी लाखोंची रोकड लुटून नेल्याची चर्चा आहे़ हे दोघेही संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत़