नाशिक महापालिकेतील आॅटो डिसीआर प्रणालीतील अनेक त्रुटी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:17 PM2018-01-17T19:17:14+5:302018-01-17T19:20:04+5:30
दिवसभर एकाच प्रकरणावर काथ्याकूट : अभियंता-वास्तुविशारदांसमोर सादरीकरण
नाशिक - महापालिकेतील नगररचना विभागात आॅनलाईन बांधकाम परवानगीसाठी दि. १ मे २०१७ पासून लागू करण्यात आलेल्या आॅटो डिसीआर प्रणालीच्या कार्यपद्धतीविषयी शहरातील अभियंते व वास्तुविशारदांसमोर सादरीकरण झाले परंतु, दिवसभर केवळ एकाच प्रकरणावर काथ्याकूट झाला. सदर प्रकरणही निकाली निघू न शकल्याने प्रणालीतील काही त्रुटी समोर आल्या. दरम्यान, या प्रणालीला आपला अजिबात विरोध नसून प्रणालीतील त्रुटी दूर होण्याची आवश्यकता असल्याचे मत अभियंता आणि वास्तुुविशारद संघटनांच्या पदाधिका-यांनी व्यक्त केले.
१ मे २०१७ पासून नाशिक महापालिकेत आॅनलाईन बांधकाम परवानगीसाठी मे. सॉफ्टेक कंपनीतर्फे आॅटो डिसीआर प्रणाली लागू झाली आहे. मात्र सहा महिन्यात दाखल झालेल्या सुमारे नऊशे प्रस्तावांपैकी केवळ १२० प्रस्ताव मंजूर झाले असून त्यातही केवळ १९ प्रस्तावांनाच बांधकाम मंजुरीची परवानगी व नकाशा प्राप्त झाला आहे. सदर प्रणालीत असलेल्या त्रुटींबाबत वास्तुविशारदांच्या संस्था व मनपात अनेक वेळा चर्चा झाल्या. परंतु मनपाने वास्तुविशारद व अभियंत्यांकडून येणा-या प्रस्तावातच त्रुटी असल्याचे सांगितले होते. सदर प्रणालीबाबत वाढत्या तक्ररी लक्षात घेता आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी मनपाचे प्रतिनिधी, सॉफ्टेक कंपनीचे प्रतिनिधी व वास्तुविशारद व अभियंता यांचे संयुक्त चर्चासत्र घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१७) दि इंडियन इन्स्टिटयूट आॅफ आर्कीटेक्टस्, नाशिक सेंटर, आर्कीटेक्टस् अॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशन आणि एसीसीई, नाशिक सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने वैराज कलादालन येथे आॅटो डिसीआर प्रणालीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.यावेळी आयुक्त अभिषेक कृष्ण, नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागुल व नगररचना विभागातील अधिकारी, सॉफ्टेक कंपनीतर्फे अरु णकुमार, भीमसेन मिश्रा तसेच शहरातील वास्तुविशारद,अभियंते आदी उपस्थित होते. यावेळी, १४ मजली इमारतीसंबंधीचा एक नमुना प्रस्ताव दाखल करण्यात आला व त्या दरम्यान येणा-या अडचणींवर चर्चा करण्यात आली. मात्र, सकाळी ११.५४ वाजता अपलोड केलेल्या प्रकरणावर सायंकाळपर्यंत कार्यवाही झाली नाही. याशिवाय, पार्कींग, व्हेंन्टिलेशन डक्ट यामध्ये त्रुटी दिसून आल्या. चर्चासत्रात आॅटोडिसीआर प्रणाली हवीच मात्र ती अतिशय अचूक, दोषरहित व जलदगतीने कार्यरत असावी असाही सूर दिसून आला. आर्कीटेक्टस् अॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गुळवे यांनी प्रास्ताविक केले तर दि इंडियन इन्स्टियूट आॅफ आर्कीटेक्टस् नाशिकचे अध्यक्ष प्रदीप काळे यांनी कंपनी व मनपा यांच्यात झालेल्या करारातील अनेक बाबींची माहिती उपस्थितांना करुन दिली. एसीसीई, नाशिकचे अध्यक्ष पुनित राय यांनी आभार मानले.
आयुक्तांसमवेत बैठक
चर्चासत्रप्रसंगी आयुक्तांनी नेमणूक केलेल्या कंपनीच्या कामाचे स्वरु प समजावून घेत संबंधितांना सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने, प्रस्ताव छाननीसाठी कर्मचा-यांची संख्या वाढविणे, तांत्रिक माहितीसाठी प्रशिक्षण व्यवस्था उभारणे,नगररचना नियमावलीप्रमाणे आॅटोडिसीआर मध्ये बदल करणे, मंजूर प्रस्तावांना तातडीने बांधकाम परवानगीचा दाखला व मंजूर नकाशा मिळणे आदींचा समावेश आहे. पुणे मनपाच्या धर्तीवर वास्तुविशारद व अभियंत्यांना मोठ्या भूखंडावरही परवानगीचे अधिकार देण्याला आयुक्तांनी अनुकूलता दाखवली. पुणे मनपाने दोन हजार चौ.मी. पर्यंतच्या जागेवर वास्तुविशारदांना रिस्क बेस्ड पद्धतीने परवानगीचे अधिकार दिले आहेत. त्यावर अधिक सखोल चर्चा करणेसाठी गुरूवारी (दि. १८) आयुक्तांच्या दालनात दुपारी २.३० वाजता कंपनी प्रतिनिधी, वास्तुविशारद व अभियंता प्रतिनिधी यांची बैठक होणार आहे.