शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करावे, कृषी तंत्रज्ञान महोत्सवात प्रशांत नाईकवडी यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:12 PM2017-12-09T17:12:43+5:302017-12-09T17:38:36+5:30
शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकता आहे.
नाशिक : शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पादनातील गुणवत्ता उंचावण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवडी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित पाच दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप शनिवारी(दि.9) झाला. यावेळी ह्यसेंद्रिय शेती : संधी, उत्पादन आणि प्रमाणीकरणह्ण विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन होते. डॉ. प्रशांत नाईकवडी म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करत आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील शेती नापीक होण्याची भीती आहे. सध्या अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत. ही आनंदाची बाब असून देशात पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीतून हरितक्रांती घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार द्यावा असे आवाहनही नाईकवडी यांनी केले. यावेळी कृषी यांत्रिकीकरणाच्या अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बस्तेवाड यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी यांत्रिकीकरणामुळे व्यवसायात मनुष्यबळाच्या समस्येवर मात करणो शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विभागातील अधिकारी, शेतकरी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले.डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. राजाराम पाटील यांनी आभार मानले.