मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून... खंडेराव मंदिरांमध्ये चंपाषष्ठी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:51 PM2017-11-24T23:51:20+5:302017-11-25T00:32:48+5:30
नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. पांढरे घोडे, भाविकांच्या डोक्यावर पिवळे फेटे, वाद्यांची सुरेल साथ, जागोजागी भाविकांकडून फुले, बेलभंडाºयाची होत असलेली उधळण, सदानंदाचा जयघोष यामुळे वातावरण भारून गेले होते. मंदिरांच्या गाभाºयात आणि प्रवेशद्वारावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळी काकडआरती, अभिषेक, पूजा, आरती, नैवेद्य, महाप्रसाद आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. तत्पूर्वी जागरण गोंधळाचा कार्यक्रमही पार पडला. कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी विक्रमी संख्येने खंडेराव मंदिरात हजेरी लावली होती. सकाळी गंगाघाटावरील खंडेरावकुंड ते शक्तीनगर, हिरावाडीपर्यंत खंडेरायांची छोटी मूर्ती, मुखवटा, पादुका यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मिरवणूक व रहाडी जागरणाच्या कार्यक्रमसह उदय गांगुर्डे यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गोरक्षनगरला खंडेरायाचा जयघोष
पेठरोडवरील गोरक्षनगर येथील खंडेराव महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पंचोपचार पूजन, अभिषेक पूजन व सत्यनारायण पूजन करण्यात आले. दुपारी खंडेराव महाराजांची परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी गोरक्षनगर कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाचे प्रवीण जाधव, दत्तू राऊत, अपूर्व शास्त्री, सचिन साळुंके, प्रशांत कुलकर्णी, शिवाजी शिंदे, किशोर गावंडे, श्रीराम गावंडे, निखिल सहाने आदी उपस्थित होते.