‘न्यू एज्युकेशन’चा माजी विद्यार्थी मेळावा
By admin | Published: December 22, 2015 10:22 PM2015-12-22T22:22:29+5:302015-12-22T22:27:35+5:30
वर्ग भरला : माजी शिक्षक-विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
नाशिक : दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अमृतपूर्ती महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांचा मेळावा डी. डी. बिटको बॉइज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहात झाला.
वय वर्षे २० ते ८२ व्या वर्षापर्यंतचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन यांच्या हस्ते माजी शिक्षक आबा गाडगे, मंगला कविश्वर, वसुधा कडेपूरकर, कमलाकर यार्दी, रामदास महाले, भास्कर तानपाठक, सुरेश पिंगळे, भि. रा. सावंत, कृष्णाजी देवते, दत्तात्रय भटमुळे, जयकृष्ण शर्मा यांचा, तर माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ क्रीडा समीक्षक वि. वि. करमरकर, लक्ष्मण सावजी, विनायक पांडे, संजय चव्हाण, सचिन जोशी, शोभा छाजेड, उत्तरा करंदीकर, सुजाता डेरे, अजित चव्हाण, नरेंद्र छाजेड, लक्ष्मण मंडले, जयराम पुरी यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी भारती आव्हाड यांनी गणेशवंदना सादर केली. अमृतपूर्ती समितीचे प्रमुख प्रा. रवींद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. भास्कर कविश्वर, वाय. डी. बिटको गर्ल्सच्या मुख्याध्यापक रेखा काळे यांनी परिचय करून दिला.
सुरेखा कमोद यांनी अध्यक्षांच्या संदेशाचे वाचन केले. स्नेहल सारंग यांनी सूत्रसंचालन केले. सचिव हेमंत बरकले यांनी आभार मानले. ऋतुजा नाशिककर यांनी पसायदान सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)