गोदाघाट पुन्हा बिबट्याच्या दहशतीखाली
By admin | Published: August 9, 2015 11:38 PM2015-08-09T23:38:24+5:302015-08-09T23:39:17+5:30
बळींची संख्या वाढली : वनविभागाचे होत आहे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष
लासलगाव : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील दहावर्षीय विकी शांताराम पिठे या चौथीतील विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर परिसरात तीन बिबट्यांचा मुक्तसंचार असूनही याकडे वन विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती लोकांच्या बळींची वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी वाट पाहणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आठ महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यातील पिठे हा सहावा बळी असून, यापूर्वी सायखेडा येथील ऊसतोड कामगाराच्या मुलाला बिबट्याने शिकार बनविले. शिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला. भुसे येथील शुभम पोटे याचा, तर म्हाळसाकोरे येथील ढोबळे या इसमाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सध्या बिबट्याच्या भीतीने शेतमजूर कामावर जाण्यास घाबरत असून, शेतीची कामेही ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. एकप्रकारे कोणतीही संचारबंदी नसताना हा परिसर बिबट्याच्या दहशतीने अघोषित संचारबंदीचा अनुभव घेत आहे.
तालुक्यातील मांजरगाव, भुसे, चाटोरी, बेरवाडी, करंजगाव, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव व नांदूरमधमेश्वर परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा पुन्हा मुक्तसंचार सुरू आहे. नैसर्गिक भक्ष्य मिळणे दुरापास्त झाल्याने भुकेपोटी ही जंगली श्वापदे आता रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनाही लक्ष्य करू लागली आहेत. तीन ते चार वर्षांपासून सातत्याने उन्हाळ्यात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत या भागातील काही गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी शिवरे गावातील दोन लहान बालकांना एकाच महिन्यात बिबट्याने शिकार केले होते. उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून पल्लवी सानप ही लहान मुलगी व आजोबा सायंकाळी घराच्या अंगणात बसले होते. आठ-साडेआठ वाजेची वेळ होती. अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या भुकेल्या बिबट्याने लहान पल्लवीला तिच्या आजोबादेखत हल्ला करून पळवून नेले. तेव्हा काही अंतरावर उसाच्या शेतात शिकार झालेल्या अवस्थेत पल्लवीचा मृतदेह आढळून आला होता, तर ही घटना घडण्याच्या पंधरा दिवस अगोदर याच गावातील दुर्गेश गोसावी या अवघ्या एकवर्षीय बाळाला बिबट्याने ठार केले होते.
या नरभक्षक बनलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शिवरे येथील दोघा लहानग्यांना हकनाक
आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शिवरे फाटा येथे नाशिक-औरंगाबाद महामार्ग पावणेदोन तास रोखून धरला
होता. वन खात्यानेही ठिकठिकाणी पिंजरे लावले. मात्र दरवेळी या बिबट्याने हुलकावणी देत महिनाभर परिसरात आपली दहशत कायम ठेवली.