नाशिकच्या गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी गोदाप्रेमी करणार परिक्रमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:10 PM2017-12-11T16:10:46+5:302017-12-11T16:19:52+5:30
रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.
नाशिक : धार्मिक महत्त्व असलेल्या पंचवटीतून जाणा-या गोदावरीपात्राची परिक्रमा करून गोदावरीचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी निर्धार करण्यात आला. रामकुंड ते तपोवन अशा मार्गाने निघालेल्या परिक्रमेत गोदाप्रेमींनी गोदापात्राची पाहणी करीत प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.
रामकुंड ते तपोवन या मार्गाने करण्यात आलेल्या परिक्रमेत गोदाप्रेमींनी अनेक ठिकाणच्या नोंदी घेत प्रदूषणमुक्तीसाठी काय करता येऊ शकेल, याबाबत आपसात चर्चा केली. गोदावरीचे प्रदूषण आणि पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा तसेच पात्रात सोडलेले सांडपाणी असे प्रकार पाहून साºयांचेच मन हेलावून गेले. रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. गोदाकाठाने सुरू झालेल्या या मोहिमेत अनेक ठिकाणी गटारीचे पाणी गोदापात्रात सोडण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्याचप्रमाणे नदी प्रवाहात निर्माल्य, प्लॅस्टिक टाकल्याचेही निदर्शनास आले. ही सारी परिस्थिती पाहून हे मार्ग बंद करण्याबाबत पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले.
तपोवनात रामसृष्टी उद्यानातील अॅम्पी थिएटरच्या जागेत काहीकाळ थांबले. या ठिकाणी शिल्पा डहाके, नीलेश गावडे, रमेश पडवळ आदींनी गोदापरिक्रमेचे महत्त्व आणि राबवायच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. गोदावरीच्या सुशोभिकरणापेक्षा गोदापात्राच्या किना-यावरील हालचाली बंद करून किनारे सुरक्षित आणि संरक्षित करण्याबरोबरच काही ठिकाणी निर्बंध घालण्याचीही चर्चा करण्यात आली.
रविवार, दि. १० रोजी राबविण्यात आलेली ही परिक्रमा आता प्रत्येक महिन्याच्या दुस-या रविवारी करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. तपोवनातील कपिला संगम पूल, परतीच्या मार्गाने लक्ष्मीनारायण पुलाखालच्या भागातून पुन्हा गोदाकाठाने यशवंत महाराज पटांगण, होळकर पुलाखालून रामवाडी पूल ओलांडून गोदापार्क येथून पुन्हा दुतोंड्या मारुती असा या परिक्रमेचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, यापुढील परिक्रमेत नाशिककर, गोदाप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.