अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून अनुदान
By admin | Published: August 1, 2016 01:13 AM2016-08-01T01:13:44+5:302016-08-01T01:14:06+5:30
बीज भांडवल योजना : अडीच लाखांचे वाटप
पंकज पाटील उपनगर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून यावर्षी अनुदान व बीज भांडवल योजनेद्वारे १७ लाभार्थ्यांना दोन लाख ६० हजार रुपये अनुदान व बॅँकेकडून १६ लाख १५ हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
केंद्र शासनाकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाला अनुदान व बीज भांडवल या दोन योजनांसाठीच निधी उपलब्ध करून दिला आहे. अनुदान योजनेमध्ये ५० हजार रुपयांपर्यंत दोर काम, झाडू-टोपले बनविणे व किराणा मालासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यावर्षी या योजनेमध्ये ५३ प्रकरण दाखल केली होती. त्यातील ८ प्रकरणांना राष्ट्रीयीकृत बॅँकांनी मंजुरी दिली, तर बीज भांडवल योजनेमध्ये ५० हजारांपासून सात लाखापर्यंत कापड विक्री, सेंट्रिंग प्लेट, झाडू-टोपले बनविणे यासाठी कर्ज दिले जाते. यामध्ये २५ प्रकरणे संबंधितांनी दाखल केले होते.
राष्ट्रीयीकृत बॅँकांनी त्यापैकी ९ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. दोन्ही योजनांतील राष्ट्रीयीकृत बॅँकांनी मंजूर केलेल्या १७ प्रकरणांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने दोन लाख ६० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे, तर बॅँकांनी १७ लाभार्थ्यांना १६ लाख १५ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
तसेच ६० टक्क्यांच्या वर ज्यांना गुण आहेत असे १५ जणांचे शिष्यवृत्ती योजनेसाठी आलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे. महामंडळाकडून महिला समृद्धी, लघु ऋण वित्त योजना, मुदत कर्ज योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजनादेखील राबविल्या जातात. मात्र या
योजनांना निधी उपलब्ध नसल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. आरणे यांनी दिली.