गुरुकुल
By admin | Published: July 19, 2016 01:38 AM2016-07-19T01:38:01+5:302016-07-19T01:40:24+5:30
वारसा : नाशिकमध्ये वेद पाठशाळांमध्ये होतेय प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे जतन
भारतात कोणे एकेकाळी गुरू-शिष्य परंपरेनुसार शिक्षण दिले जात असे. मुले आश्रमांत राहत, अध्यापन करीत व निरनिराळ्या विद्यांत पारंगत होत. कालौघात ही निवासी शिक्षणपद्धती मागे पडत गेली. तथापि, नाशिक परिसरात अद्यापही काही वेद पाठशाळांमध्ये याच प्राचीन परंपरेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अशाच काही गुरुकुलांचा हा परिचय...ज्येष्ठ उद्योजक किसनलाल सारडा यांनी श्री गुरुगंगेश्वर वेद पाठशाळेची स्थापना सन १९८४ मध्ये केली. त्र्यंबकरोड येथील वेदमंदिरामागे काही वर्षे ही पाठशाळा सुरू होती. सन २००० मध्ये ती महिरावणी येथे प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आली. पाठशाळेत सध्या उत्तर प्रदेश, हैदराबादसह नाशिक, मुंबई आदि भागांतील अकरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शुक्ल यजुर्वेद संहिता शिकवली जाते. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तो पूर्ण केल्यानंतर वेदविशारद ही पदवी मिळते. पुढे आणखी अभ्यास करून ही मुले घनपाठीही होऊ शकतात. पाठशाळेत सागर कुलकर्णी हे अध्यापन करतात, तर किशोर बोरसे हे व्यवस्थापनाची बाजू सांभाळतात. पहाटे पाच वाजेपासून विद्यार्थ्यांचा दिनक्रम सुरू होतो. सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५ अशी पाठशाळेची वेळ असते. सकाळी उठल्यानंतर विद्यार्थी हे प्रार्थना, धावणे, सूर्यनमस्कार घालतात. कोणत्याही गुरुकुलात विद्यार्थ्यांना स्वत:ची कामे स्वत: करावी लागतात. त्यामुळे स्वयंशिस्त लागते. वडील स्वत: वेद अभ्यासक असल्यास वा पौरोहित्य करीत असल्यास आपल्या मुलाने हा वारसा पुढे चालवावा म्हणून ते त्यांना गुरुकुलात दाखल करीत असतात. निवासी पाठशाळेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांना वेदविद्येचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळते. दरम्यान, श्री गुरुगंगेश्वर वेदपाठशाळेचे विद्यार्थी गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिकला वेद मंदिरात येणार असून, तेथे वेदपठण करणार आहेत.
नाशिकपासून बारा किलोमीटर अंतरावर औरंगाबाद रोडवरील लाखलगाव परिसरात महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने निवासी वेद पाठशाळा चालवली जाते. बारा वर्षांपूर्वी श्रीकृष्णशास्त्री गोडसे यांनी या पाठशाळेची पंचवटीतील सीतागुंफा येथे स्थापना केली. त्यानंतर काही वर्षे ही पाठशाळा गंगापूर गावात, तर वर्षभरापासून लाखलगाव येथे सुरू आहे. पाठशाळेत राज्याच्या विविध भागांतील पंचवीस मुले वेदविद्येचे शिक्षण घेतात. पाठशाळेत विद्यार्थ्यांना प्राचीन गुरू-शिष्य परंपरेनुसार यजुर्वेद, संस्कृत व्याकरणासह इंग्रजी, गणित, विज्ञान, भूगोल, संगणक आदि विषयांचे शिक्षण मोफत दिले जाते. विद्यार्थी पहाटे साडेचार वाजता उठतात. स्नानानंतर प्रात:संध्या, चहापान-नाश्ता, सकाळी ८ ते ११ या वेळेत अध्ययन, १२ वाजता भोजन, दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत पाठशाळा, त्यात वेदमंत्रांचे पठण, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सायंसंध्या, ७ वाजता आरती व शिवमहिम्न स्तोत्राचे सामूहिक पठण, ८ वाजता भोजन, रात्री ९ वाजता श्लोक पाठांतर, रात्री १० वाजता हनुमान चालिसा पठण करून निद्राधीन होणे अशी विद्यार्थ्यांची दिनचर्या असते. सात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे बारावी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळते. विद्यार्थी अन्यत्र त्यापुढेही शिक्षण घेऊ शकतात. वेदशास्त्रसंपन्न रवींद्र पैठणे पाठशाळेचे प्रधान आचार्य असून, त्यांच्यासह गोविंद पैठणे अध्यापनाचे काम पाहतात.