हज-उमराह यात्रा : ९७ इच्छुकांना दोन कोटींना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:05 PM2019-02-10T18:05:56+5:302019-02-10T18:07:55+5:30
जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती.
नाशिक : इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली आहे. फिर्यादीसह अन्य ९७ यात्रेकरूंची सुमारे २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक या ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शकील गणी सय्यद (५२, रा. आडगाव) यांनी वडाळारोडवरील जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. यामध्ये संपूर्ण राज्यातील लोकांचा समावेश आहे. टूर्सचे संचालक संशयित अब्दुल मतीन मनियार, समीर शमशुद्दीन मनियार, अजीज बनेमियॉँ मनियार, शाहरूख जुनेद मनियार, अमजद करीम मनियार, शकील बनेमियॉँ मनियार, मुस्तकीम गणी मनियार, अझहर अयाज मनियार, सोहील शेख यांनी आपापसांत संगनमताने कट कारस्थान रचून हज-उमराहच्या धार्मिक यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचे फिर्यादी शकील गणीभाई सय्यद यांनी तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्यातील ९७ नागरिकांनी पोलिसांकडे या घोटाळ्यात फसवणूक झाल्याप्रकरणी धाव घेतली आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत शहरात झालेला हा कोट्यवधींचा घोटाळा असून तक्रारदारांसह फसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात पावणे दोन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात या संशयितांविरुद्ध दाखल झाला होता. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सुनील नंदवाळकर करीत आहेत.