सन्मान : सिन्नर, लासलगाव, चांदवड, कळवण येथील शाळा-महाविद्यालयांत महिलांचा सत्कार महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:10 AM2018-03-09T00:10:59+5:302018-03-09T00:10:59+5:30
नाशिक : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक घरात स्त्रीचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केली. मुलगी सक्षम केली पाहिजे, तिला तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू दिले पाहिजे, असे सांगळे यांनी सांगितले. यावेळी सुनीता कचरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मातांना स्वत:ची जाणीव करून दिली. नलिनी क्षत्रिय यांनी मातांना सक्षम करायचे असेल तर प्रत्येक बाबतीत तिला विश्वासात घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सरपंच अनिता जाधव यांनी आईवरील कविता म्हटली. शशिकला पाटोळे यांनी साने गुरुजींच्या आईने त्याच्यावर घडविलेल्या संस्काराप्रमाणे आपणही आपल्या मुलांवरती असेच संस्कार करावे, असे आवाहन केले. महिलांची प्रगती व्हावी, त्यांच्याविषयी समाजात असलेला दुजाभाव याविषयावर काही चिंतन व्हावे यानिमित्त शेठ ब.ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सिन्नर शहरातून प्रभातफेरी काढून जनजागृती केली.
प्रभातफेरीच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतिनिधी व शिक्षिका यांचा प्राचार्य दिलीप वाणी व पर्यवेक्षक बाळासाहेब हांडे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ढोल पथकाच्या जयघोषात नारीशक्तीचा गजर करत शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. द्या शिक्षणाला गती, व्हा फुले सावित्री, स्त्रियांना द्या मान, वाढेल देशाची शान अशा घोषणा ढोल पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिल्या. यानंतर सिन्नर नगरपालिकेतील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पर्यवेक्षक बाळासाहेब हांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या फेरीनंतर महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील अठरा वर्षं पूर्ण झालेल्या विद्यार्थिनींची मतदार नोंदणी करून घेण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद दापूर शाळेत शाळा समितीचे अध्यक्ष योगेश तोंडे, सदस्य धीरज सोमाणी यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे आयोजन करत विविध वेशभूषा सादर केल्या. यात सावित्रीबाई फुले, जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पंडित रमाबाई, अहल्याबाई होळकर या थोर महिलांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी परिधान केल्या होत्या. इ. ३ री च्या विद्यार्थिनींनी विविध महिलांच्या जीवनकार्यावरील भाषणे सादर केली. उपशिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्र माचे नियोजन करत उपक्रमाबाबत मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. यावेळी गायत्री रजपूत यांनी आभार मानले.