अवयवदान प्रचारासाठी ‘आरोग्य’ची मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:30 AM2017-08-31T00:30:20+5:302017-08-31T00:30:27+5:30
महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व विविध समाजसेवी संघटना यांच्या सहकार्याने शहरातून अवयवदान प्रचारासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदानाची जनजागृती केली.
नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढाकाराने शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व विविध समाजसेवी संघटना यांच्या सहकार्याने शहरातून अवयवदान प्रचारासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदानाची जनजागृती केली. इदगाह मैदान येथून सकाळी मानवी साखळीस प्रारंभ झाला. महापौर रंजना भानसी, विद्यापीठाचे प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून व आकाशात फुगे सोडून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे, डॉ. प्रशांत पाटील, स्वप्निल ननावरे, भूषण चिंचोले, सुनील देशपांडे, नितीन रौंदळ, मनीषा रौंदळ, शैलजा जैन, रवींद्र दुसाने, साधना दुसाने आदी मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. प्रति-कुलगुरू खामगावकर यांनी अवयवदानाचे महत्त्व विशद केले. कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. प्रशांत पाटील, सुनील देशपांडे, डॉ. भाऊसाहेब मोरे यांनीदेखील महत्त्व सांगितले. मानवी साखळीत विद्यार्थ्यांनी ‘अवयवदान महादान’ मरावे परि अवयवरूपी उरावे, अवयवदान सर्वश्रेष्ठ दान, मृत्यूला रोखण्याची ताकद तुमच्या श्रेष्ठ दानात आहे. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. इदगाह मैदानापासून सुरू झालेली मानवी साखळी ठक्कर बाजार, सीबीएस, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर थांबा या मार्गावरून अशोकस्तंभ या ठिकाणांपर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली होती. विद्यापीठाचे अधिकारी विद्या ठाकरे, डॉ. स्वप्निल तोरणे, बाळासाहेब पेंढारकर, संदीप राठोड, डॉ. प्रदीप आवळे, डॉ. राकेश पाटील, डॉ. रिस्किन मर्चंट, वैद्य कमलेश महाजन, डॉ. सागर नरोडे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. प्रेम बरनसबास, शिना जॉन, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, आदी उपस्थित होते.
या कॉलेज, संस्थांचा सहभाग
या रॅलीत मविप्रचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, केबीएच दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथी, सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालय आॅफ नर्सिंग, एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय नर्सिंग कॉलेज, धन्वंतरी होमिओपॅथी, गोखले नर्सिंग कॉलेज, मविप्र केटीएचएम महाविद्यालय, कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कॉलेज, मातोश्री नर्सिंग, मविप्र कृषी महाविद्यालय, व्ही. एन. नाईक संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.