पक्षिमहोत्सवाचे उद्घाटन : तीन दिवस विविध कार्यक्रम; वनविभागाकडून छाायचित्र प्रदर्शन; पर्यटकांची गर्दी नांदूरमधमेश्वर येथे भरला पक्ष्यांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:54 AM2018-01-20T00:54:59+5:302018-01-20T00:55:33+5:30
सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली.
सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली असून, तीन दिवस चालणाºया सोहळ्याचे उद्घाटन आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुख्य वनसंरक्षक एन.के. प्रवीण, सुनील लिमये, एस. व्ही रामाराव, उपवनसंरक्षक रामानुजन, सामाजिक वनीकरणाचे सूर्यवंशी, वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, नांदूरमधमेश्वर अभयारण्याचे अधिकारी भगवान ढाकरे, चापडगावचे सरपंच सुवर्णा दराडे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, नंदू सांगळे, गणपत हाडपे, संदीप टर्ले, पंडित सोनवणे, सुनील सोनवणे, दत्तू मुरकुटे, सुभाष सोनवणे, नितीन मोगल आदींसह पक्षिप्रेमी उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल कदम म्हणाले की, १९८६ मध्ये हा भाग अभयारण्य म्हणून अधिसूचित केला असून, नाशिक वन्यजीव विभागाकडून क्षेत्र व्यवस्थापन करण्यात येते. धरण क्षेत्रात अनेक पक्ष्यांची गर्दी असते, तर विविध प्रकारच्या माशांच्या जातीही येथे पहायला मिळतात. पक्षी निरीक्षणाचा छंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविणे विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी ही मेजवानी असल्याने तीन दिवस या महोत्सवाचे आयोजन केल्याने पर्वणी ठरली आहे.
महाराष्ट्राचे भरतपूर संबोधल्या जाणाºया नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य वन्यजीव विभागाच्या वतीने पहिल्यांदाच तीन दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पक्षितज्ज्ञांची व्याख्याने होणार असून, रंगीबेरंगी पक्षी निरीक्षणची संधी पर्यटकांना प्राप्त होणार आहे. पक्ष्यावरील पुस्तके व छायाचित्र प्रदर्शन या निमित्ताने भरविण्यात आले आहे. परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना पक्ष्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे तसेच शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक शाळा या दिवसात भेट देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या पक्ष्यांचा मुक्काम
अभयारण्यात टिल्स, गडवाल, शॉवलर, क्रे न, पिनटेल आदी स्थलांतरित पक्षी, तसेच पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, मोर शराटी, मोठा रोहित, क्र ॉच-कुलंग आदी स्थानिक स्थलांतरित पक्षी, तर पाणकोंबडी, तलवार बदक, तवंग, थापट्या, भुवई, लालसरी, लहान बगळा, जांभळी पाणकोंबडी, मुग्ध बलाक, आयबीस, स्टॉर्क आदी स्थानिक पक्षांबरोबरच या ठिकाणी पक्ष्यांप्रमाणेच उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, रानडुक्कर, मृदू कवच कासवे, विविध प्रकारचे साप तर ऊसक्षेत्र असल्याने बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवासही बघायला मिळतो तर जलाशयात २४ विविध जातीचे मासे, ४०० पेक्षा अधिक वनस्पती विविधता आहे. वनविभागामार्फत विविध पक्षिचित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन, पक्षी निरीक्षणासाठी दुर्भिण, गाइड, दिशादर्शक फलक, विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. एकंदरीत वनविभागाने पहिल्याच वर्षी उत्कृष्ट नियोजन केले आहे याद्वारे पक्षी अभ्यासक आणि पक्षिप्रेमींसाठी मेजवानी ठरत आहे.