जानेवारीपासून ७० गावांमध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र उपक्रम
By admin | Published: December 9, 2014 01:26 AM2014-12-09T01:26:11+5:302014-12-09T01:26:40+5:30
जानेवारीपासून ७० गावांमध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र उपक्रम
नाशिक : येत्या जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्'ात पाण्याची पातळी खोल गेलेल्या जवळपास ७० गावांमध्ये विविध उपक्रम राबवून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना केल्या. जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१६ असा सलग वर्षभर विविध कार्यक्रम राबवून मार्च २०१६ मध्ये त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. साधारणत: दोन ते तीन मीटरपेक्षा अधिक खोलवर गेलेली भूजल पातळी व गेल्या तीन वर्षांत सलग टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात साखळी बंधारे, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात येणार असून, रोजगार हमी योजनेत ज्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता असेल त्याठिकाणी रोहयोच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली व टंचाईमुक्त महाराष्ट्र यशस्वी करण्यासाठी गावांचा शोध व कामे सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.