मोहाडी येथे इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा फेस्टिव्हलचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:53 AM2018-02-10T00:53:39+5:302018-02-10T00:54:34+5:30
दिंडोरी : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दिमाखात झाला.
दिंडोरी : इंडिया ग्रेप हारवेस्ट व वाइन फेस्टिव्हलचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे दिमाखात झाला. सदर महोत्सवानिमित्त ११ मार्चपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवार, शनिवार व रविवार विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, माजी आमदार माणिकराव कोकाटे, सह्याद्रीचे विलासराव शिंदे, पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष माणिकराव पाटील, कैलास भोसले, रवींद्र बोराडे, जगन खापरे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, प्रवीण जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना फेस्टिव्हलचे आयोजक जगदीश होळकर यांनी वाइन फेस्टिव्हलची संकल्पना विशद केली. यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतमालाचे विपणन थेट ग्राहकांपर्यंत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जगभरात द्राक्षामुळे नाशिकची नवी ओळख निर्माण झाली आहे. ग्रेप फेस्टच्या निमित्ताने जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटनास चालना मिळणार आहे. सह्याद्रीने शेतकºयांना एकत्रित करत त्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक शेतमालासाठी इंडस्ट्री उभी करण्याची गरज असल्याचे सह्याद्रीचे विलास शिंदे यांनी सांगितले. पर्यटन विकास महामंडळाचे आशुतोष राठोड यांनी बोलताना सह्याद्री फार्मने शेतकरी व ग्राहक दोघांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, सह्याद्री हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असून, त्यास अधिकृत पर्यटन क्षेत्र म्हणून दर्जा देत विकसित करण्याचे आश्वासन यावेळी राठोड यांनी दिले. यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी विलास शिंदे यांनी उभारलेल्या या कामाला सलाम करत भविष्यात शासन त्यांच्या या कामासाठी नक्कीच मदत करेल, असे आश्वासन दिले.
इंडिया ग्रेप फेस्टचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार होता; मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित होते, हा धागा पकडत आपल्या भाषणात आमदार अनिल कदम यांनी शेतकºयांसाठी होत असलेला हा कार्यक्रम असून, त्यांनी यायलाच हवे होते असे सांगितले. यानंतर उत्सव सह्याद्रीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.