राजकीय व्यंगचित्र काढण्यावर आल्या मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:05 AM2017-10-29T00:05:07+5:302017-10-29T00:14:29+5:30
व्यंगचित्रकारांना राजकीय चित्र काढणे जिकिरीचे झाले आहे. पूर्वी अशी स्थिती नव्हती पण आता मर्यादा आल्या आहेत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी शनिवारी (दि. २८) ‘हास्यदीपावली’ या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
नाशिक : व्यंगचित्रकारांना राजकीय चित्र काढणे जिकिरीचे झाले आहे. पूर्वी अशी स्थिती नव्हती पण आता मर्यादा आल्या आहेत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी शनिवारी (दि. २८) ‘हास्यदीपावली’ या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. गंगापूररोड येथील कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना झळके यांनी, चित्रकार आणि साहित्यिकांनी झिडकारलेल्या व्यक्ती व्यंंगचित्रकार होतात, असे स्पष्टपणे नमूद करताना साहित्य संमेलने भरविली जातात परंतु व्यंगचित्र प्रदर्शने भरवली जात नसल्याबाबत खंत व्यक्त केली. अशा प्रकारची प्रदर्शने भरवणे ही काळाची गरज असून पुणे, नागपूर, मुंबई, नांदेड याठिकाणी या प्रकारची प्रदर्शने भरवून कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले. कार्टुनिस्ट कम्बाइन या संस्थेतर्फे आयोजित या चित्रप्रदर्शनात राज्यातील ५० व्यंगचित्रकारांची विविध विषयांवरील १५० हून अधिक व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये चारुहास पंडित, विवेक मेहेत्रे, घनश्याम देशमुख, संजय मिस्त्री, रवींद्र बाळापुरे, अरविंद राजपूत, राजेंद्र सरग यांच्यासह ज्ञानेश सोनार, महेंद्र भावसार, विश्वास सूर्यवंशी, दिनेश धनगव्हाळ, रवि भागवत, भटू बागले, राधा गावडे, शरयू फरकांडे आदी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा यामध्ये समावेश आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कोंडाजीमामा आव्हाड, तानाजी जायभावे आणि विश्वास ठाकूर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सोमवार (दि. ३०)पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, अधिकाधिक विद्यार्थी, चित्रप्रेमींनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
हास्यदीपावली या व्यंगचित्र प्रदर्शनात आपल्या सभोवताली घडणाºया विविध घटनांवर आधारित व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये स्त्री भ्रूणहत्या, मुंबई येथे झालेली रेल्वेस्थानक दुर्घटना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, भ्रष्टाचार, कौटुंबिक घडामोडी आदी विषयांवरील मार्मिक व्यंगचित्रे रेखाटण्यात आली असून, क्रि केटर, सिनेअभिनेते, अभिनेत्री राजकारणी व्यक्ती यांची व्यंगचित्रे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.