कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मधु मंगेश कर्णिक
By admin | Published: June 16, 2014 11:57 PM2014-06-16T23:57:25+5:302014-06-17T00:07:33+5:30
विश्वस्तपदी अशोक हांडे : पाच वर्षांसाठी नियुक्ती
नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विश्वस्तपदाच्या एका जागेवर प्रसिद्ध कलाकार अशोक हांडे यांची नियुक्ती झाली आहे. विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत ही नियुक्ती करण्यात आली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या विश्वस्तपदाची मुदत येत्या २५ जून रोजी संपत आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली. त्यात एकमताने ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी ‘मराठा बाणा’ फेम प्रसिद्ध कलावंत अशोक हांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष रंजना पाटील व प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर यांची विश्वस्तपदाची मुदत संपल्याने त्यांच्या रिक्तपदांवर मधु मंगेश कर्णिक व अशोक हांडे यांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे यांनी सांगितले. अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केलेली असून, त्यांनी महाराष्ट्र राज्य साक्षरता व संस्कृती विभागाचे अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व राज्य मराठी विकास संस्थेचे अतिरिक्त संचालकपद भूषविले आहे. याशिवाय कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट यांचे ते संस्थापकही आहेत. शैक्षणिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या मधु मंगेश कर्णिक यांनी साहित्यातील कथा, कादंबरी या वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केले आहे.
तात्यांचे माझ्यावर ऋण
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे एक लेखक म्हणून माझ्यावर मोठे ऋण आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तात्यांच्या या ऋणातून अंशत: उतराई होण्याचा मी नम्रपणे प्रयत्न करेन. वयोमानामुळे मी आता कोणतीही पदे स्वीकारत नाहीत. परंतु प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने आग्रह धरल्याने मी विनम्र भावनेने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यथाशक्ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.
- मधु मंगेश कर्णिक
जब्बार पटेल टीकेचेच धनी
प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी दहा वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; परंतु पटेल यांची कारकीर्द नेहमीच टीकेस पात्र ठरली. जब्बार पटेल यांच्या नियुक्तीवरूनच त्यावेळी मोठी टीका झाली होती. स्थानिक व्यक्तींऐवजी बाहेरील व्यक्तींना अध्यक्ष व विश्वस्तपदी नेमले जात असल्याने आणि सदर व्यक्ती प्रतिष्ठानच्या कार्यास वेळ देऊ शकत नसल्याने पटेल यांना विरोध झाला होता. या विरोधानंतरही विश्वस्त मंडळाने पुन्हा एकदा नाशिक बाहेरील व्यक्तीची निवड केल्याने साहित्य क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.