Video : राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित हॉटेलवर तुकाराम मुंंढेंचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:06 PM2018-04-04T12:06:31+5:302018-04-04T15:01:04+5:30
अतिक्रमण विरोधी मोहीम : नदीपात्रात भराव टाकून बनविले होते हॉटेल किनारा
नाशिक - महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील नासर्डी नदीपात्रात भराव टाकून अनधिकृतपणे उभारलेल्या हॉटेल किनाराचे बांधकाम उद्धवस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदर हॉटेलमध्ये एका नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या नेत्याचीही भागीदारी असल्याचे सांगितले जाते. शहरात महापालिकेमार्फत गेल्या महिनाभरापासून अतिक्रमण विरोधी मोहीम जोरदारपणे सुरू आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच इमारतीच्या सामासिक अंतरातही उभारलेली अनधिकृत बांधकामे काढण्याची मोहीम सुरू आहे. बुधवारी (दि.४) सकाळी १० वाजेच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील हॉटेल किनारावर धडक मारली. सदर हॉटेल हे नासर्डी नदीपात्रात भराव टाकून उभे करण्यात आल्याची तक्रार आहे याशिवाय, सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचेही महापालिकेचे म्हणणे आहे.
सदर हॉटेल हे एका नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सदर अतिक्रमणाला अभय मिळत होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आणि गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनाघडामोडी पाहता आयुक्तांनी सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, अतिक्रमण विभागाला आज पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर नासर्डी नदीपात्रात भराव टाकून उभारलेले हॉटेल किनारा हटविण्यास सुरुवात झाली. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम सुरू असून तीन जेसीबीद्वारे बांधकाम पाडले जात आहे. तत्पूर्वी, अनधिकृत बांधकाम हटविण्याची कुणकुण लागल्याने जागामालकाने पथकाशी वादही घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाने आपल्या कारवाईला सुरुवात केली.