नाशिककरांना आंबट, गोड चवीची भुरळ,बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली
By नामदेव भोर | Published: January 16, 2018 06:10 PM2018-01-16T18:10:10+5:302018-01-16T18:20:13+5:30
स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नाशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे नाशिक शहरासह परिसरातील बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.
नाशिक : लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नाशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटन स्थळांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर बरोबरच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे नाशिक शहरासह परिसरातील बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज दोन ते अडीच टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दाखल होत आहे. सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगांव, घागबारी, लिंगामा आदी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील शेतकीर पारंपरिक पिकांसह शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहे. या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे याभागात गेल्या दशकभरापासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठया प्रमाणावर होऊ लागले आहे. विंटर, एसए कॅमेर ओझा, नादीला, आर 2, आर 1, तसेच स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभीया यांसह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड मोठया प्रमाणात आहे. नगदी पिक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोची पॅकींग करून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवले जातात. यातील स्ट्रॉबेरी बराच मोठा भाग नाशिक शहरातही येतो. त्याचप्रमाणे नाशिक शहर परिसरातील काही भागात आणि आडगाव शिवारातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील फळ विक्रेत्यांकडेही लालबूंद झालेली स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दिसून येत आहे. तर काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यवसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करतात. बहुतांश शेतकरी हे स्व:ताच स्ट्रॉबेरी पाटी किंवा खोक्यात भरु न परिसरातील पर्यटन स्थळावर व रस्त्यांवर ठिकठिकाणी छोटे-छोटे स्टॉल उभारु न स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहे. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना यापासून रोजगार उपलब्ध झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार पेठेत रोज दोन ते अडीच टन स्ट्रॉबेरीची आवक होत असते. यात किमान 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने स्टॉबेरीची विक्री होते. स्ट्रॉबेरीची प्रतवारी आणि दर्जा नुसार स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये चढ उतार होत असतो. तर चांगल्या गुणवत्तेचा माल महाबळेश्वर पाचगणीच्या नावखाली अधिक दर घेत असल्याचे स्ट्रॉबेरीचे घाऊक व्यापारी संतोष अहूजा यांनी सांगितले.
प्रतवारीनुसार स्ट्रॉबेरीला मिळते किंमत
सध्या नाशिक शहरात सुरगाणा कळवणच्या स्ट्रॉबेरीसर महाबळेश्वर आणि पाचगणीच्या स्ट्रॉबेरीचीही आवक वाढली आहे. घाऊक बाजारपेठांत स्ट्रॉबेरीचा एक किलोचा बॉक्स 40 ते 100 रु पये दराने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारपेठेत एक किलोचा बॉक्स 60 ते 120 रु पये या दराने विकला जात आहे. प्रतवारी आणि दर्जानुसार कमी अधिक दरानेही स्ट्रॉबेरी उपलब्ध होत असून किरकोळ बाजारात दोनशे ग्रॅमपासून स्ट्रॉबेरीचे पॅकेट उपलब्ध आहेत.
थंडी ठरतेय उपयुक्त
स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. सध्या बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे. सध्या स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी चांगली आहे.