कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी भोजापूरचे आवर्तन सोडण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:08 AM2017-11-28T00:08:56+5:302017-11-28T01:54:47+5:30
भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.
सिन्नर : भोजापूर धरणातून रब्बीसाठी येत्या ६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आवर्तनापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या. लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकºयापर्यंत पाणी पोहच करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी व पाटबंधारे विभागाने समन्वयातून आवर्तन यशस्वी करावे, असे आवाहन आमदार वाजे यांनी केले.
येथील कडवा शासकीय विश्रामगृहात भोजपूर कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणाºया आवर्तनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता एस. एस. गोंदकर, शाखा अभियंता बी. के. अचाट, बी. डब्ल्यू बोडके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, दीपक बर्के, उपअभियंता सी. एम. आव्हाड, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी गणपत केदार, कारभारी आव्हाड, भागवत घुगे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गळती, बाष्पीभवन याचा विचार करता रब्बीसाठी १५०, तर पिण्यासाठी प्रवाही ५० असे एकूण २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिली. डाव्या कालव्यावरील शेवटच्या दोडीला शेवटच्या टोकापासून तर उजव्या कालव्यावरील पिंपळे येथून पाणी देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. धरणाच्या साठवणक्षेत्राची मोजणी करण्याचे ठरले असतानाही कोणतेही सर्वेक्षण झाले नाही. पाणी वापर संस्था पैसे देण्यास तयार असूनही पाटबंधारे विभागाने प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार शेतकºयांनी यावेळी केली. त्यावर शिंदे यांनी ७ लाख रुपये भरून पाटबंधारे विभाग मोजणी करणार असल्याचे आश्वासन दिले. पाणी आरक्षण करताना पाणी वापर संस्थांना विश्वासात घेतले जात नाही. कालवा दुरु स्तीची कामे संथ गतीने सुरु आहेत. कालव्याचे पाणी मोजण्यासाठी कोणतीची यंत्रणा अस्तित्वात नाही. कालव्याला बोगदे पाडून होणाºया पाणीचोरीचे व्हीडीओ, छायाचित्र देऊनही संबंधितांवर कारवाई केली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली. यावेळी गणपत केदार, भागवत घुगे, अनिल सांगळे, नीलेश केदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
११० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण
धरणात सध्या ३४३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून, पिण्यासाठी ११० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासह २०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गळतीसह पाणीचोरीबाबत शेतकºयांनी तक्रारी केल्या. पाणी चोरी करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी दिले. गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी येत्या आठ दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.