सदस्य चिंतेत : तुकाराम मुंढेंकडून पंचनामा शक्य नगरसेवक निधीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:33 AM2018-02-09T01:33:20+5:302018-02-09T01:33:47+5:30
नाशिक : महापालिका कायद्यानुसार नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांतील कामांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची तरतूद आहे.
नाशिक : महापालिका कायद्यानुसार नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांतील कामांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची तरतूद आहे. मात्र, नाशिक महापालिकेत नगरसेवक निधीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी देण्याचा पडलेला पायंडा नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून मोडला जाण्याची शक्यता असल्याने सदस्य चिंतेत पडले आहेत. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात स्थायी समिती अथवा महासभेने नगरसेवक निधीची तरतूद केली तरी आयुक्तांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही, उलट यापूर्वी देण्यात आलेल्या निधीचा पंचनामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक निधीच्या नावाखाली सुमारे २० ते ३० लाख रुपये प्रत्येक नगरसेवकाला त्यांनी सुचविलेल्या कामांसाठी वापरण्याचा प्रघात पडलेला आहे. प्रवीण गेडाम हे आयुक्त असताना त्यांनी या नगरसेवक निधीला आक्षेप घेतला होता. महासभेने मंजूर केलेला निधी देण्यातही त्यांनी उत्पन्नाचे कारण दर्शवत खळखळ केली होती तर नंतर नगरसेवकांना हा निधी विकास निधी म्हणून वापरता येईल, असे समर्थन केले गेले होते. गेडाम यांनी त्यावेळी नगरसेवक निधीत घट केल्याने सत्ताधारी-प्रशासनात संघर्षाची स्थिती निर्माण झालेली होती. मागील वर्षी महापालिकेत भाजपा बहुमताने सत्तारूढ झाली. त्यावेळी स्थायी समितीने प्रत्येकी ४० लाख रुपये नगरसेवक निधीची शिफारस केली होती, तर महासभेत महापौरांनी थेट ७५ लाख रुपयांचा निधी जाहीर करत खिरापतच वाटली होती. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीही सुरुवातीला प्रत्येक नगरसेवकास ७५ लाखांचा निधी देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. परंतु, नगरसेवक निधी हवा असेल तर मागील पंचवार्षिक काळातील काही कामांचा स्पीलओव्हर कमी करून देण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार, सत्ताधारी भाजपाने मागील काळातील सुमारे २०३ कोटी रुपयांच्या कामांना फास लावला आणि ७५ लाखांच्या निधीचा मार्ग मोकळा करून घेतला. आता मावळत्या आयुक्तांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १४७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, ते नवनियुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून स्थायी समितीला सादर होणार आहे. यंदा, स्थायी समिती तसेच महासभेने नगरसेवक निधीची शिफारस केली तरी नियमावर बोट ठेवून काम करणाºया नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून निधीला फाटा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातील सदस्यही चिंतेत पडले आहेत.