पारा ९.९ अंशावर : राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:43 PM2019-01-24T13:43:05+5:302019-01-24T13:54:02+5:30
शहराच्या किमान तापमानाचा पारा १२.८ अंशापर्यंत पोहचला होता तर कमाल तापमान २७ अंशापर्यंत होते; मात्र अचानकपणे उत्तर भारतातून आलेल्या शीतलहरीमुळे शहराचे किमान तापमान ९.९अंशापर्यंत घसरले आहे.
नाशिक : राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान गुरूवारी (दि.२४) ९.९ अंश इतके नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकमध्ये थंडीचा सर्वाधिक कडाका पुन्हा जाणवू लागल्याने नाशिककर गारठले आहे.
शहराच्या किमान तापमानाचा पारा १२.८ अंशापर्यंत पोहचला होता तर कमाल तापमान २७ अंशापर्यंत होते; मात्र अचानकपणे उत्तर भारतातून आलेल्या शीतलहरीमुळे शहराचे किमान तापमान ९.९अंशापर्यंत घसरले आहे. त्यामुळे थंडीची लाट शहरात वाढली आहे.
डिसेंबरचा पंधरवडा ते जानेवारीच्या पंधरवड्यापर्यंत नाशिककरांनी कमालीची थंडी अनुभवली. किमान तापामानाचा पारा थेट ५.३ अंशापर्यंत खाली घसरला होता. पंधरा दिवसांपासून नाशिककरांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. तापमानाचा पारा १२ अंशावर गेल्याने पहाटेदेखील थंडीची तीव्रता कमी जाणवू लागली होती. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे पुन्हा कपाटात ठेवले होते; मात्र अचानकपणे मंगळवारी रात्रीपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात बदल झाला. बुधवारी शहरात दुपारपर्यंत मळभ दाटून आले होते. तसेच सकाळी थंड वारे अधिक वेगाने वाहत होते. या वाऱ्याचा वेग रात्री अधिक वाढल्यामुळे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान ९.९ अंश इतके हवामान केंद्राकडून मोजले गेले.
शहराच्या वातावरणात अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे नागरिकांनी सकाळी पुन्हा उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसून आले. सकाळी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उबदार कपडे परिधान करुन वर्गात प्रवेश केला.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान असे
नाशिक- ९.९
जळगाव- १०.०
अहमदनगर- ११.७
पुणे- ११.९
महाबळेश्वर १२.८